घिरट्या घातल्या, परंतु त्याला त्यांनी चोच मारली नाही. आपल्याला
प्रेमाने भाकरी देणारा असे करणार नाही, असा त्यांना विश्वास होता.
ची ची करीत नर व मादी बसली होती. समुद्र गर्जना करीत होता.
" शेवटी मरण, मरण, सर्वांना मरण, " असे का त्या लाटा किनाऱ्यावर
आदळून सांगत होत्या ? ओहोटी-भरती, जगणे-मरणे असाच हा संसार
आहे असे का समुद्र सांगत होता ? मरावयाचे असले म्हणून का जन्मलो
नाही तो मरावे ? जीवनाचा अनुभव घेऊन मग मरण आले तर त्याचे
दुःख नाही. परंतु असे अकाली मरण, अंड्यातच मरण दुःखदायी आहे.
फुलाची भाकरी आली. ती पाखरे तेथेच होती. त्याने त्यांना आधी
तुकडा दिला, परंतु ती घेत ना. त्यांनी तोंडे फिरविली. ची ची करीत ते
जोडपे उडून गेले. फुलालाही त्या दिवशी जेवण गेले नाही. तो तसाच न
खाता पाणी पिऊन खोलीत खाली मान घालून बसला होता.
दुपारची वेळ झाली. हातात पाटी घेऊन कळी आली. हळूहळू फुलू
पाहाणारी कळी आली. ते पाहा तिच्या तोंडावर शतरंग पसरत आहेत,
परंतु रंग आले व गेले. फुलाची खाली झालेली मान पाहून कळी दुःखी
झाली.
"काय झाले आज ? " तिने विचारले.
" माझा वेल कुस्करण्यात आला. खोलीतील पक्ष्याचे घरटे पाडण्यात
आले. अंडी फुटली. पाखरे ची ची करीत बसली. तुकडा न घेता निघून
गेली. कळे, कसा मी हसु ? ह्या लहानशा खोलीतील एवढासाही आनंद
देवाला बघवला नाही का ?"
" ज्या पुस्तकाने तुम्हांला मरणासही हसत-हसत मिठी मारायला
शिकविले, त्या पुस्तकाने निराशेत, दुःखात शांती ठेवायला नाही का
शिकविले ? रडू नका. तुमचा अपराध नाही. पाखरे पुन्हा आली तर पुन्हा
त्यांना प्रेम द्या."
"पुन्हा कशाला प्रेम देऊ ? पुन्हा येथे तो घरटे बांधतील, अंडी
घालतील. पुन्हा घर पाडण्यात येईल, अंडी फोडण्यात येतील. नको. त्या
पाखरांना आता मी प्रेम देणार नाही. ती आली तर त्यांना घालवीन..
मलाच येथे एकट्याला मरू दे. त्यांच्या अंड्यांना का मरण ? "
३६ * फुलाचा प्रयोग