पान:फुलाचा प्रयोग.djvu/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिपायांनी ते मडके फोडले. तो वेल कुस्करून फेकून देण्यात आला. फुला कष्टाने ते सारे पाहात होता. साहेब अजून खोलीत पाहात होते. त्यांचे लक्ष एकदम वर गेले. तो तेथे पाखरांचे घरटे.
 “ पाखरांचे घरटे येथे कशाला ? तुम्ही पक्षी पाळाल व त्यांच्याबरोबर निरोप पाठवाल. त्यांच्या गळ्यांत चिठ्ठया बांधाल व धाडाल. हे नाही उपयोगी. शिपाई, पाडा ते घरटे पाडा."
 " त्यात मादीने अंडी घातली आहेत. ती येईल व टाहो फोडील. नका पाडू ते घरटे. अंड्यांतून चिव चिव करीत पिले बाहेर येतील. नका, नका फोडू ती अंडी नका मारू उद्याचे आनंदी जीव. "
 " शिपाई, बघता काय ? ओढा काठीने ते घरटे."
 ते घरटे पाडण्यात आले. तो सुंदर अंडी खाली पडून फुटली. फुलाला पाहावेना. त्याने डोळे मिटून घेतले.
 " पुन्हा तुझ्या खोलीत पक्षी दिसला किंवा घरटे दिसले तर अंधार- कोठडीत तुला ठेवीन. याद राख. " असे म्हणून ढब्बूसाहेब निघून गेले.
 फुला खोलीत उदासीन होऊन बसला होता. त्याचा प्रयोग नष्ट झाला होता. पाखरांचे घरटे नष्ट झाले होते. ती अंडी नष्ट झाली होती. ते जोडपे, ते निळे निळे पक्षी येतील, घरटे नाही असे पाहून त्यांना काय वाटेल ? त्यांची अंडी नाहीत, मी मात्र जिवंत आहे, हे पाहून त्यांना काय वाटेल? नर मादी येथे असतो तर त्यांनी अंडी वाचविण्यासाठी स्वतःचे प्राणही दिले असते. चोचींनी त्यांनो लढाई केली असती. परंतु मी ? मी फक्त डोळे मिटून घेतले. त्या पाखरांना मी काय सांगू ? ती पाखरे मला काय म्हणतील ?
 आणि इतक्यात ती मादी खिडकीत आली, तो घरटे नाही. ती ची ची करू लागली. खोलीभर तिने फेन्या घातल्या. ची ची. परंतु कोण उत्तर देणार ? समुद्राकडे तोंड करून ती ची ची ओरडू लागली. ती का नराला हाक मारीत होती ? तो पाहा नर आला. निळा-विळा नर. किती सुंदर. दोघांनी टाहो फोडला. क्षणात खोलीकडे तोंडे करून ओरडत, क्षणात समुद्राकडे तोंड करून ओरडत. फुलाच्या डोक्यावरून त्यांनी

३४ * फुलाचा प्रयोग