आत्याचा निरोप घेउन तो येतो की काय ? असा विचार फुलाच्या मनात आला. आत्याची आठवण येऊन फुला सद्गदित झाला. तो पक्षी आला की फुला त्याच्याकडे प्रेमाने बघे. त्या पक्ष्यासाठी आपल्या भाकरीतील तुकडा तो ठेवी. पक्षी येताच तो तुकड़ा फेको पक्षी खाली येई व चोचीने तो तुकडा - घेऊन पुन्हा तो खिडकीत बसे. पुढे-पुढे तर फुलाच्या हातातूनच तो पक्षी तुकडा घेई. पक्षी फुलाचा मित्र बनला.
एके दिवशी जोडपे तेथे आले, नर व मादी दोघे आली. फुलाने दोघांना - दोन तुकडे दिले. त्या जोडप्याने खोलीची पाहाणी केली. एके ठिकाणी घरटे बांधण्याचे त्यांनी ठरविले. दोघे गवत, पाला, काड्या, चिंध्या आणू लागली. घरट्याचे काम सुरू झाले. नर व मादी दोघे खपत. मधून-मधून गोड-गोड गाणी गात. एकमेकांच्या चोचीत चोच घालीत. फुलाच्या डोक्यावरून भुर्र करीत खोलीत फेन्या घालीत. घरटे तयार झाले. मादीने ..त्यात अंडी घातली. मादी घरट्यात बसून राही. अंड्यांना ऊब देई.
फुला समुद्रकाठच्या तुरुंगात गेल्यापासून कळी दुःखी झाली. कळीला वाटत होते की आता कैदी आपल्या तुरुंगात राहील. रोज त्याला भेटता येईल. त्याच्याजवळ बोलता येईल. लिहा-वाचायला शिकता येईल. परंतु तिची निराशा झाली. तिला वाईट वाटले. तिचा आनंद अस्तास गेला. ती ना खाई ना पिई. तो एकटी बसे, उदासीन दिसे. तो न हसे, न खेळ. ती फिक्कट दिसू लागली. ती अशक्त झाली. शेवटी ती अंथरुणाला खिळली.
" कळ्ये, तुला काय होते ? " पित्याने विचारले.
" मला सांगता येत नाही. काहीतरी होत आहे खरे. मला काही सुचत नाही, काही रुचत नाही, मला कंटाळा आला आहे."
" कोठे जायचे बाळ ? "
" बाबा, समुद्रकाठी घ्या ना बदली करून ? किती दिवसांत मी समुद्र पाहिला नाही. अगदी लहानपणी पाहिला होता. समुद्राच्या लाटांत पुन्हा .एकदा डुंबू दे. खेळू दे. वाळूत किल्ले बांधू दे. बाबा, नदीला समुद्राकडे जावेसे वाटते. तसे मला झाले आहे. उचंबळणारा समुद्र पाहून तुमच्या कळीचे मन उचंबळेल. मी सुंदर-सुंदर शिपल्या गोळा करीन, सुंदर खडे गोळा करोन, घ्या ना बदली करून."
३० फुलाचा प्रयोग