पान:फुलाचा प्रयोग.djvu/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देशाचा मान वाढवा, कीर्ती वाढवा, गौरव वाढवा. तुमच्या देशाचे उदाहरण इतरांना होऊ दे. तुमच्या देशाकडे सारी दुनिया कौतुकाने बोट दाखवील असे वागा.
 " ह्या अपराध्याला येथे उभे करण्यात आले आहे. पाहा, तो कसा शांतपणे उभा आहे ! पाप असे उभे राहू शकत नाही. हा मनुष्य अपराधी आहे का महात्मा आहे ? आपण चौकशी करू. जे कागदपत्र ह्याच्या घरी सांपडले. ते मी वाचीत आहे. इतरही सारा पुरावा मी बघत आहे. जर हा मनुष्य अपराधी ठरला तर त्याचे आपण शासन करू. सूड म्हणून नाही, न्यायासाठी म्हणून. सूडबुद्धी माणसाला शोभत नाही. आपण माणुसकी वाढवू या. फाशीची शिक्षा रद्द करण्यात येत आहे. आरोपीला तुरुंगात घेऊन जा.ढे चौकशी करू. आपण न्यायाने वागू या. मनुष्यधर्माला जागरूक राहू या. परमेश्वर सर्वांना सद्बुद्धी देवो. "
 राजाच्या भाषणाचा विलक्षण परिणाम झाला. " किती न्यायी राजा, खरा राजा, राजा चिरायू होवो ! आपण माणसे होऊ या. खरेच, सूड चाईट. देशाची कीर्ती वाढवू या. उगीच मारले ते प्रधान. परंतु आता राजा आला. आता सारे ठीक होईल. तो मार्ग दाखवील किती थोर मनाचा राजा. राजाचा जयजयकार असो ! " असे लोक म्हणू लागले.
 फुलाला पुन्हा तुरुंगात नेण्यात आले. लोक राजाची स्तुती करीत घरोघर गेले. मांग घरी गेला. तो गब्रू मात्र त्या वघस्तंभाजवळ मेल्याप्रमाणे बसला होता.





२८ फुलाचा प्रयोग