पान:फुलाचा प्रयोग.djvu/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " पक्का निगरगट्ट."
 असे लोक म्हणत होते. फुलाला वधस्तंभाजवळ उभे करण्यात आले. अधिकारी उभे होते. मांग दोरी हातात घेऊन तयार होता. शेवटची खूण होण्याचा अवकाश. वधस्तंभावर सूर्याचे किरण पडले होते. सर्वत्रच आता प्रकाश पडला. सकाळचा कोवळा सोनेरी प्रकाश !
 परंतु हे काय ? हा कसला गलबला ? " हटो, हटो, राजा आ गया.- हटो ; ठैरो, राजा आ गया. ठैरो. " असे शब्द कानांवर आले. घोडेस्वार दौडत येत होते. त्यांनी आपले घोडे गर्दीत लोटले. घोड्यांच्या टापांखाली कोणी तुडवले गेले. “ हटो, ठैरो, राजा आ गया. " सर्वत्र एकच घोष, एकच आरोळी. ते घोडेस्वार वधस्तंभाजवळ गेले. " राजा येत आहे. थांबा."असा त्यांनी निरोप दिला. सर्व लोकांचे डोळे वधस्तंभाकडून आता राजाकडे वळले. काठे आहे राजा, नवीन उदार राजा ? तो पाहा आला. राजा आला. शुभ्र घोड्यावर बसून वायुवेगाने राजा येत होता." राजा चिरायू होवो ! क्रांती चिरायू होवो !” अशा गर्जना झाल्या.
 वधस्तंभाजवळ जाऊन राजा उभा राहिला. राजाला पाहाताच. सर्वांची हृदये उचंबळली. सूडबुद्धी मावळली. हृदये बदलली. डोळे निराळे झाले. राजा बोलू लागला. सर्वत्र शांतता होतो.
 " माझ्या प्रिय प्रजाजनांनो, मी वेळेवर आलो. तुमच्या हातून पाप होऊ नये म्हणून देवाने मला वेळेवर आणले. प्रजेच्या पापाची जबाबदारी राजांच्या शिरावर असते. माझे दोन प्रधान गेले. त्यांची चौकशी केली गेली असती तर ते निर्दोष ठरते. माझे जणू दोन डोळे गेले. दोन हात गेले. कोणी तरी काही बातमी उठवतो. तुम्ही ती खरी मानता. असे चंचल व अधीर नका होऊ. सत्यासत्याची निवड करायला शिका. विचारी प्रजेचा, संयमी प्रजेचा मला राजा होऊ दे. आपल्या देशाची जगात अपकीर्ती व्हावी असे तुम्हाला वाटते का ? ह्या देशातील लोक वाटेल तेव्हा खवळतात, एखाद्याला बिनाचोकशी हालहाल करून ठार करतात. ह्या देशात न्यायनीती नाही असे जगाने म्हणावे ? आपल्या देशाला कमीपणा येईल असे कोणीही कधीही वर्तन करता कामा नये.

राजा आला, फुला वाचला २७