पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिच्या आयुष्यातला तो पहिला प्रसंग होता. तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. आनंदाच्या भरात तिनं सांजा शिजवला नि बेळगावच्या रस्ते, स्टँड, स्टेशनवरील भिकारी, कुष्ठरोग, अपंग, अंध, निराश्रितांना खाऊ घातला. तो घालत असताना तिच्या लक्षात आलं की, यांना खरंच मदतीची गरज आहे. मग तो तिचा दिनक्रमच बनला. इव्हान रोज संध्याकाळी नित्यनियमाने त्यांना खाऊ-पिऊ घालू लागली. तिच्या लक्षात आलं की, यांना अन्नाइतकीच औषधाची, उपचाराची गरज आहे. तिनं त्यांना सरकारी दवाखान्यात नेणं, मलमपट्टी करणं, औषध देणं सुरू केलं. तिच्या या नित्याच्या निष्ठेचा त्रास तेथील काहींना होणं स्वाभाविक होतं... त्यांनी ओरड सुरू केली... पण इव्हान आपल्या सेवेशी इमान राखून राहिली. मग इव्हानच्या रोग्यांची संख्या वाढू लागली. रिक्षा, औषधे, जेवण सारं इव्हान आपल्या नव-याच्या निवृत्तीवेतनातून करायची. लोकांना खरं वाटायचं नाही... मतलबी लोकांनी आवई उठवली... ही बाई धर्मांतर करते... किडनी विकते... हिच्याकडे एवढा पैसा येतो कुठून... वर्तमानपत्रांनी पण चौकशी न करता कॉलम भरभरून लिहून आपली ‘सामाजिकता' सिद्ध केली... बेळगावला मदर इव्हान लोमेक्सना मंगल पुरस्कार जाहीर करण्यासाठी तिथल्या विद्यानिकेतनमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेतली... तिथंही पत्रकारांनी मला छेडलं... मी नम्रपणे त्यांना विचारलं की, “तुम्ही एकदा तरी काम जाऊन पाहिलंय का?" पत्रकारांचे मौन त्यांचा गोठणबिंदू सांगून गेला.

 इव्हान लेमेक्सना 'मदर' ही उपाधी कोणत्या चर्चने दिली नाही. ही उपाधी, पदवी तिच्या कामातून आली. ती दिलीय अशा लोकांनी ज्यांची ती निरपेक्ष, मनोभावे सेवा करते. चर्चने अशी पदवी द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण समज आल्यापासून तिला चर्चला गेल्याचे आठवत नाही. इव्हानचं दुःख तेच आहे. इव्हान मनुष्य हीच एक जात मानते. माणुसकी हाच तिचा धर्म. तिच्या होमलेस होममध्ये सर्व धर्माचे लोक, स्त्री-पुरुष, मुलं आहेत. संस्था नोंदणीकृती आहे. संस्थेत प्रत्येकास ज्याच्या त्याचा धर्म पाळण्याचे, प्रार्थना, व्रत करण्याचे स्वातंत्र्य आहे. आश्रमात कोणतंही धार्मिक कर्मकांड नाही. तिच्या या जगावेगळ्या व्रतामुळे मात्र तिची मोठी पंचाईत होऊन गेली आहे. ख्रिश्चन समुदाय तिला ख्रिश्चन मानत नाही. कारण ती चर्चमध्ये येत नाही. हिंदू-मुसलमान तिला ख्रिश्चन मानतात कारण ती जन्मजात ख्रिश्चन आहे. इव्हान आपणास एकविसाव्या शतकाचा खरा आचारधर्म शिकवते.

प्रेरक चरित्रे/३०