पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिचा सखा, मित्र, मार्गदर्शक, आश्रयदाता झाला. जीवनात जे करायचं ते मनस्वीपणे हा तिचा परिपाठ. त्यामुळे चर्चच्या कर्मकांडात ती कधी अडकली नाही. घरी राहून व्यक्तिगत प्रार्थना केल्यानं तिनं जे बळ मिळवलं त्यानं तिला तारलं.
 वयाच्या छत्तिशीत असताना हॉटेलमध्ये काम करणारा इव्हानचा भाऊ एक दिवस अचानक एक प्रस्ताव घेऊन आला. म्हणाला, “हॉटेलात एक कॅनेडियन गृहस्थ आलेत. वय वर्षे ६0. त्यांना एक जीवनसाथी (कंपॅनियन) हवाय... तू विचार कर." विचार होतो नि लग्नही. या लग्नानं लोमेक्सच्या जीवनात क्रांती केली. याचं सारं श्रेय डॉ. रेमंड लोमेक्सना द्यायला हवं. ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीत कॅनडात कार्य करणारे डॉ. रेमंड काही काळ गोव्यात आलेले. अचानक आलेल्या श्रीमंतीत लोमेक्सचं भांबावून जाणं स्वाभाविक होतं; पण तिनं स्वतःला सावरलं. दारी आलेली समृद्धी अनेक दिवस दबून राहिलेल्या ऊर्मीसाठी वापरायची तिने ठरलवं. डॉ. रेमंडनी प्रोत्साहन दिलं. अन् गोव्याच्या कळंगुट बिचसमोर तिने मोफत उपचार सुरू केले. तेही आपत्ती म्हणून. पण पुढे तीच इष्टापत्ती ठरली. औपचारिकपणे होमिओपॅथी, आयुर्वेद, शुश्रूषा (नर्सिंग) शिकत, तिनं स्वतःतील सेविका स्वतःच घडवली. 'हे सारं येशूच्या प्रेरणेनं घडतं' ही तिची ठाम समजूत, श्रद्धा! जीवनात काही करायचं, घडायचं तर अविचल निष्ठा हवी. ती लोमेक्सकडून शिकावी.

 वडिलांच्या मृत्यूनंतर सोसलेल्यावर फुंकर पडावी म्हणून केलेलं लग्न. मातृत्वाची अनिवार ओढ मनी. बाळ होऊ देणं धोक्याचं असं डॉक्टर सांगत असतानाही इव्हाननी नेडनला जन्म दिला. नेडन मतिमंद जन्मली. इव्हानच्या हृदयी असलेल्या मातृत्वाच्या कस्तुरीगंधांनी नेडनला आपलंसंच केलं. आज १८ वर्षांची पण अवघी चार फुटांची नेडन आईभोवती अबोल घुटमळत राहते... सोबतीला अशाच व्याधीग्रस्त पामेला, रेणुकालाही बहिणींप्रमाणे एकसारखं करताना मी पाहतो तेव्हा रक्ताच्या नात्यातील व्यर्थपणा मला ठामपणे लक्षात येत राहतो. नेडन पदरात पडली नि डॉ. रेमंडनी लोमेक्सचा पदर सोडला. ते अकाली निवर्तले तशी लोमेक्स ढासळली; पण क्षणभर. परत तिनं गोवा सोडून बेळगाव गाठलं, पण आता नोकरी मिळणं दुरापास्त झालेलं. कशी तरी गुजराण करत असताना अचानक एके दिवशी ऑस्ट्रेलियाहून एक पत्र व चेक हाती पडला. नव-याला निवृत्तीवेतन मंजूर झालं होतं नि लोमेक्स डॉ. रेमंडची एकमेव वारस ठरली होती. चेक तेवीस हजार रुपयांचा होता. इतके पैसे एकावेळी पाहण्याचा

प्रेरक चरित्रे/२९