पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपल्या ‘डॉ. रेमंड लोमेक्य होम फॉर होमलेस'मध्ये आणते. त्यांच्या जखमा साफ करणे, शी-शू पाहणे, अंघोळ घालणे, कपडे धुणे, पुरुष रुग्णांची दाढी करणे, औषधोपचार, कुणी निवर्तला तर ज्याच्या त्याच्या धर्मानुसार अंत्यक्रिया. हे सारं स्वखर्चानं, नव-याच्या मिळणाच्या निवृत्तीवेतनातून चालतं.
 कोडग्या, गोठलेल्या, निबर मनाच्या आपल्या समाजास कोणी पदर मोडून लष्कराच्या भाकरी भाजतं हे खरं वाटत नाही. आपणास काही करता येत नाही यावर खात्री असलेले तथाकथित जागरूक समाजरक्षक मग लोमेक्सविरुद्ध तक्रार गुदरतात. आठ वेळा आठ-आठ तास चौकशी, मारहाण, कोठडी होते. निष्पन्न मात्र काहीच होत नाही. बेळगावचा फायदा एकच झाला. रस्त्यावर कोणी पडलेला असला की, पोलिसांचा फोन येतो... कधी एखाद्या नागरिकाचा पण... ‘अमुक ठिकाणी एक निद्रिस्त निराधार पडलाय... घेऊन जाणार काय?' इव्हान शांतपणे हात पुढे करते. आज असे १५ ‘होमलेस', 'होपलेस' इव्हानकडे येऊन सनाथ, आशावादी, सानंद जीवन जगत आहेत. हे सारं पाहताना, ऐकताना, समजून घेताना मला माझीच शिसारी येत होती ती माझ्याभोवतीच्या निष्क्रियतेमुळे... तटस्थपणामुळे!
 मदर इव्हान लोमेक्सचं हे जगावेगळं जग मी जागी जाऊन पाहिलं नि मला नवी जाग आली. मी केलेल्या तुटपुंज्या समाजसेवा नामक लुडबुडीचीही शरम वाटली. मी मदरचं जीवन समजून घेतलं तेव्हा लक्षात आलं की, हे येरागबाळ्याचं काम नाही. ज्याच्या आत-आत संवेदनेचा सततचा पाझर असतो तोच हे करू जाणे.

 तशी इव्हान खिश्चन कुटुंबात जन्मली. आई-वडील तमिळ मातृभाषी. २८ नोव्हेंबर १९४६ ला मदुराईत जन्मलेली इव्हान. सेनेतील वडिलांच्या नोकरीमुळे तिची फरफाट होत राहिली. वडील इंग्रजांच्या फौजेत कॅप्टन. पुढे मराठी लाईट इन्फंट्रीच्या बेळगाव छावणीत आले. तत्पूर्वी सिकंदराबाद आदी ठिकाणी बदल्या. इव्हान इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकत राहिली; पण वडिलांच्या अकाली निधनाने कुटुंबाची वाताहातच झाली. भावानी हॉटेलमध्ये नोकरी पत्करली. कशी तरी मॅट्रीक पास झालेल्या इव्हाननं टायपिंग शिकून घेतलं नि वकिलांकडे पाचशे रुपयावर गुजराणा केली. घरी आई-भावाचं करत ती अकाली प्रौढ झाली नि आईसाठी अविवाहित राहिली. घरातील ख्रिश्चन संस्कारांमुळे येशू ख्रिस्त तिला भेटला नि तोच

प्रेरक चरित्रे/२८