पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यह कभी न भूलना भारतवर्ष प्राचीन है।" टाळ्यांच्या प्रचंड गडगडाटाने त्यांनी कवी संमेलनावर पकड मिळविली.
 यशवंतराव चव्हाण यांनी राष्ट्रीय पातळीवर व केंद्रात गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थ आयोगाचे अध्यक्ष, उपपंतप्रधान, विरोधी पक्षनेता अशी अनेक पदं भूषविली. पण त्या सर्वापलीकडे एक सुसंस्कृत राजकारणी मनुष्य म्हणून असलेली त्यांची प्रतिमा मला अधिक महत्त्वाची वाटते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. यशवंतराव चव्हाण हे मूलतः समाजशील गृहस्थ होत. त्यामुळे लोकसंग्रह व लोकस्मरण यात त्यांचा हात धरणारा विरळा. गर्दीत ओळखीच्या प्रत्येकास नावानिशी बोलवण्याची त्यांची कला त्यांच्या लोकसंग्रहाचे रहस्य म्हणून सांगता येईल. सामान्यातल्या सामान्य कार्यकत्र्याची त्यांनी सतत आठवण ठेवली. चौकशीचा रिवाज ठेवला. पदापेक्षा आपल्यातला माणूस जिवंत राहिला पाहिजे यांची ते दक्षता बाळगत. पदामुळे अहंकार येऊ नये म्हणून स्वतः ऋजू राहात. आपल्यावर कधी काळी उपकार केलेल्यांच्या छोट्या गोष्टींमचं स्मरण करून उतराई करीत. वाचन, चिंतन नियमित करीत. आपल्या पत्नीचं स्मरण नेहमी ठेवीत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी फोन करून त्यांना संरक्षण मंत्री होण्याचं निमंत्रण दिलं तेव्हा ते पत्नीला विचारून निर्णय देतो म्हटल्याने नेहरूंना मोठं आश्चर्य वाटलं होतं. कोणताही निर्णय त्यांनी पत्नीशी सल्लामसलत केल्याशिवाय घेतला नाही. हे होतं त्यांचं स्त्री दाक्षिण्य.

 त्यांच्या भाषण व साहित्यातून जे यशवंतराव चव्हाण दिसून येतात त्यांची प्रतिभा लक्षात येते. क-हाडचं साहित्य संमेलन, कोल्हापूरच्या वि. स. खांडेकर ज्ञानपीठ सत्कार, न. चिं. केळकर जन्मशताब्दी व्याख्यानमालेचं अध्यक्षीय भाषण, संरक्षण मंत्री म्हणून संसदेतील भाषणे अशी अनेक भाषणे ऐकली, वाचली की या माणसाची प्रतिभा लक्षात येते. त्यांच्या भाषा, भाषण व भविष्यवेधी गुणांची कदर प्रा. ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, ग. दि. माडगूळकर साऱ्यांना होती. ज्ञानपीठ मिळाल्यानंतर कोल्हापूरच्या खासबागेत झालेलं भाषण ऐकून वि. स. खांडेकर म्हणाले होते की, “मला यशवंतराव चव्हाणांसारखा गुणग्राहक साक्षेपी समीक्षक लाभला असता तर माझ्यातला साहित्यिक आणखी वेगळा घडला असता." आचार्य अत्रेसारख्या टीककाराला यशवंतराव चव्हाणांनी आपल्या शालीनतेनं गारद केलं होतं. हे कोण विसरेल. पंडित भीमसेन जोशीचं गाणं ऐकत राहावं वाटलं म्हणून विदेश जाणं रद्द करणारा हा मनस्वी आस्वादक!

प्रेरक चरित्रे/१२