पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविण्याची नामी संधी लाभली. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृती व समाजकारण हेच आपलं इतिकर्तव्य बनवून टाकलं होतं. ते करताना त्यांना अनेकदा मनाला मुरड घालावी लागली. तडजोडी कराव्या लागल्या. पक्षांतरं झाली. त्यामुळे धरसोडीच्या दोषाचे खापर त्यांच्या माथी फुटले. तरी जीवनात आलेल्या प्रत्येक संधीच त्यांनी कर्तव्यभावना, शुचिता व सुसंस्कृतपणानं सोनं केलं.
 यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री झाले, तेव्हा सर्वांत प्राथमिकता होती ती सेनादलाचं नीतीधैर्य वाढवण्याची. त्यासाठी त्यांनी तिन्ही दलाच्या नियमित बैठकांचा रिवाज पाडला. रोज सकाळी ९.३० वाजता संरक्षण मंत्रालयात तिन्ही दलांचे प्रमुख संरक्षण सचिव, स्वतः यशवंतराव उपस्थित असत. त्या बैठकांमागे महात्मा गांधींच्या दैनिक संवादातून सौहाद्र निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असायचा. त्या सभांचं नावंच मूळी प्रार्थना बैठक (Prayer Meeting) ठेवलं होतं. रोज संरक्षण स्थितीचा आढावा, प्रशिक्षण, उत्पादन, साधन संग्रहावर खल असायचा. सैनिक दुर्गम जागी पहारा देत. यशवंतरावांनी टोकावरच्या एकट्या दुकट्या सैनिकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा रिवाज सुरू केला. या समाजशील धोरणाचा फायदा लगेचच १९६५ मध्ये झालेल्या पाकिस्तान युद्धात आपणास मिळाला. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी कठोर निर्णय घेऊन पाकिस्तानला जेरीला आणलं. सेना साधनसंपन्न केली. मिग विमानांची निर्मिती, पॅटन रणगाडे, बोफोर्स तोफा इत्यादींनी आज आपलं सैन्य सज्ज दिसतं, त्याचा पाया यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिला होता. हे इतिहासाला नाकारता येणार नाही.

 संरक्षण मंत्री होताच त्यांनी सैन्याप्रमाणेच भारतीय नागरिकांचे मनोधैर्य बलवत्तर केलं. संरक्षणमंत्री झाल्यावर आलेल्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी त्यांनी आपली संरक्षण सिद्धता प्रदर्शित करण्याकडे विशेष लक्ष पुरविले होते. त्यातून जगभर भारताच्या संरक्षण क्षमतेत सुधारणा होत असल्याचा संदेश गेला. त्या काळी प्रजासत्ताक दिनी सायंकाळी नवी दिल्लीत हिंदी साहित्य संमेलनातर्फे कवी संमेलन योजलं जायचं. चीनच्या नामुष्कीमुळे संरक्षण मंत्री सर्वांचे केंद्र होते. संमेलनाला यशवंतराव चव्हाण यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं... हे काय बोलणार हिंदी असा नूर... सूर होता. यशवंतराव चव्हाण तयारीनिशी आले होते. त्यांच्या अस्खलित वाक्याने यशवंतरावांनी दिल्लीकरांना काबीज केलं. ते म्हणाले, “चीन चीन है, पर

प्रेरक चरित्रे/११