पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


भाषी राज्याविषयीच्या लोकभावना त्यांनी लक्षात आणून दिल्या. त्या वेळी नेहरूंचे स्वागत सर्वत्र काळे झेंडे दाखवून झाल्यानं त्यांना गुजरात व महाराष्ट्र स्वतंत्र करणे भाग पडलं. स्वतंत्र महाराष्ट्राचे मराठी राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला.
 १ मे, १९६० ला ते मुख्यमंत्री झाल्यावर एका मोठ्या वादानं चर्चेचं वादळ उठलं. महाराष्ट्र राज्य 'मराठ्यांचं' की मराठीचं? कारण त्यांच्या मंत्रीमंडळात मराठे बहुसंख्य होते... यशवंतराव ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर चळवळीत बहुजनांचे ते समर्थक होते... यशवंतरावांनी खंबीरपणे हे राज्य मराठीचे आहे असे नुसते ठासून सांगितले नाही तर ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी ‘मराठी विश्वकोश मंडळ' व 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ' स्थापन केले. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. तर्कतीर्थ लक्ष्णशास्त्री जोशींसारख्या पंडीताची त्यावर नेमणूक करून आपण ब्राह्मणद्वेष्टे नाही हे कृतीने सिद्ध केले. मुख्यमंत्री पदाच्या आपल्या उण्यापुऱ्या दोन वर्षात त्यांनी महत्त्वाच्या विषयांत मूलभूत व क्रांतिकारी निर्णय घेऊन अंमलबजावणीचा धडाका सुरू केला. मराठी माध्यमाच्या उच्च शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठाची स्थापना, सहकार प्रसारासाठी धनंजय गाडगीळांची नियुक्ती, सत्तेच्या विकेंद्रीकरणार्थ पंचायत राज्य व्यवस्थेची मुहूर्तमेढ, शेतीसाठी पाणीपुरवठा व्हावा म्हणून कोयना धरणांची उभारणी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, छत्रपती शाहू, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील प्रभृतींच्या विचारांची पाठराखण अशा त्रिविध पद्धतीनी त्यांनी महाराष्ट्र राज्य पुरोगामी व्हावे म्हणून एकामागून एक कार्यक्रम हाती घेतले. महाराष्ट्रातील कृषी औद्योगिक धोरणाचे जनक म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे असाधारण महत्त्व आहे. हे सर्व करत असताना सर्वसाधारण माणसात ‘लोकनेता' म्हणून त्यांनी आपल्या कार्यशैलीतून व कर्तृत्वातून जी प्रतिमा निर्माण केली ती या शताब्दी वर्षापर्यंत अन्य कुणालाही लाभू शकली नाही.

 सन १९६३ ला चीननी भारतावर आक्रमण केले व त्यात भारताला हार खावी लागली. त्याचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले. संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांना राजीरामा देणे भाग पडले. भारताला कणखर व विश्वासू संरक्षण मंत्र्यांची गरज भासू लागली. पंतप्रधान नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांची यासाठी केलेली निवड एका अर्थाने त्यांच्या कार्य, कर्तृत्व, प्रशासन कौशल्य यांचाच तो सन्मान व स्वीकृती होती. या संधीने यशवंतरावर चव्हाण यांना

प्रेरक चरित्रे/१०