पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आल्यावाचून राहणार नाही. वि. स. खांडेकरांना ते प्रकाशाचा, चांदण्याचा लेखक मानत, तर ना. सी. फडके त्यांच्या दृष्टीने कल्पनाप्रभू साहित्यक होते. वाचनाचा या काळात जडलेला छंद त्यांनी आयुष्यभर जपला.
 सन १९३८ मध्ये राजाराम कॉलेजमधून त्यांनी इतिहास व अर्थशास्त्र विषयातील मुंबई विद्यापीठाची बी. ए. पदवी मिळवली. १९४० मध्ये ते एल. एल. बी. झाले. सन १९४२ च्या लढ्यात त्यांनी सातारा जिल्ह्याचं नेतृत्व केलं व ते सक्रिय राजकारणी झाले. सन १९३० ते १९४५ हा त्यांच्या राजकीय घडणीचा काळ होता. या काळात ते तीनदा तुरुंगात गेले. तुरुंगात त्या वेळी राजकीय कैद्यांना पुस्तके वाचणे, भाषणे, शिबिरे इत्यादींची मुभा असे. त्याकाळात यशवंतराव चव्हाण यांनी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, एम. एन. रॉय, कार्ल मार्क्स, जवाहरलाल नेहरू यांच्या साहित्याचं वाचन, चिंतन, मनन, चर्चा केली. या सा-याची परिणती पुढे त्यांच्यातील प्रगल्भ विचार, व्यवहारात दिसत राहिली.
 सन १९४२ च्या २ जूनला ते विवाहबद्ध झाले नि ‘भारत छोडो' आंदोलन सक्रिय झाल्यानं त्यांना भूमिगत व्हावं लागलं. त्या अर्थानं त्यांनी कधी स्वसंसार केलाच नाही. कायम ते लष्कराच्याच भाकरी भाजत राहिले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी वयाच्या ३८व्या वर्षी सन १९५२ ला मुंबई राज्याचं पुरवठा मंत्रीपद भूषवलं. मोरारजी देसाईंच्या मंत्रीमंडळातही ते मंत्री होते. पण सन १९५६ ला झालेल्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात झालेल्या गोळीबारात १०६ हुतात्मे झाले नि मोरारजी देसाईंना पाय उतार व्हावं लागलं. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. ही संधी सोनेरी खचितच नव्हती. जनमत संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने असल्यानं यशवंतराव चव्हाण हे सतत टीकेचे लक्ष्य असायचे. आचार्य अत्रे यांनी लढ्यातून त्यांच्याविरुद्ध नि काँग्रेसविरुद्ध रान उठवलेलं. हा काळ यशवंतराव चव्हाणांच्या दृष्टीनं कसोटीचा असला तरी कर्तृत्व सिद्ध करायचा काळ होता.

 यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. मोरारजी देसाईंच्या कार्यपद्धतीपेक्षा लोकानुनय नसला तरी लोकभावनांचा आदर करण्याची कार्यपद्धती त्यांनी अवलंबली. लोकांनी बोलावलं नसलं तरी ते लोकांत जाऊ लागले. सन १९५७ ला प्रतापगडला शिवस्मारक उभारून त्यांनी मराठी मन, माती व मतं मिळविली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना स्मारकाच्या निमित्तानं महाराष्ट्रात आणून स्वतंत्र मराठी

प्रेरक चरित्रे/९