पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्ष सांपातिक (सायन ) सौर होते. पुढे मात्र चैत्रादि संज्ञांमुळे नाक्षत्र (निरयन ) सौर झालें, तथापि हेतुतः सायनच होतें.. शतपथब्राह्मणांतील कृत्तिकास्थितीच्या वाक्यावरून त्या स्थितीचा काल शकापूर्वी ३००० वर्षे हा आहे, आणि वेदसंहिता याहून प्राचीन आहेत, याविपयी शंका घेण्यास आतां जागा राहिलीच नाही. वेदांगज्योतिषाचा काल सुमारे शकापूर्वी १५०० वर्षे हा होय. त्या वेळी दिवसाच्या ६० घटिका हे मान प्रचारांत होतें. सूर्यचंद्रांच्या मध्यम गति बऱ्याच मूक्ष्म माहीत झाल्या होत्या. सौरवीचें मान चुकीचें होतें. तरी तें सौरवर्ष प्रत्यक्ष प्रचारांत आले होते; म्हणजे केवळ अधिक मास घालून सौरचांद्रवर्षांचा मेळ ठेवावयाचा, एवढीच स्थूल रीति होती असें नाही. वर्षाचे १२ सौरमासही प्रत्यक्ष प्रचारांत होते. अर्थात् कांतिवृत्ताचे बारा विभाग, त्या प्रत्येकाचे ३० विभाग (अंश), त्यांतील प्रत्येकाचे ६० विभाग (कला) ह्या पद्धतीचे बीज उत्पन्न झाले होते. आणि कालविभाग तेच क्षेत्रविभाग ही महत्वाची गोष्ट प्रत्यक्ष प्रचारांत होती. यावरून वृत्ताचे राश्यंश, कला, विकला हे भाग हिंदूंनीच प्रथम कल्पिले असें मानण्यास जागा आहे. ग्रहांच्याही मध्यमगतिस्थितीचे ज्ञान वेदांगकालाच्या अंती झाले होते असे दिसते. दुसरी महत्वाची पायरी झणजे स्पष्टगतिस्थिति. सूर्यचंद्रांच्या स्पष्टगतिस्थितीचें कांहींसें ज्ञान झाले होते असें १३ दिवसांच्या पक्षाच्या विचारांत दाखविले आहे. ग्रहांची स्पष्टगतिस्थिति समजणे आणि ती काढितां येणें ही गोष्ट सूर्यचंद्रांच्या स्पष्टस्थितीपेक्षा जास्त कठिण आहे. ती माहित झाली होती असे स्पष्ट प्रमाण सांपडत नाही. तथापि ग्रहांच्या वक्रमार्गित्वाचा विचार होत असे, यावरून ग्रहमध्यमगतीपेक्षां स्पष्टगति अनियमित आहे हे समजून आले होते. आणि यावरून ग्रहस्पष्टगतिविचारही सुरू झाला असावा असें अनुमान होते. वेदांगज्योतिषांत सौरमास आहेत. भारतांत संक्रांतीची अयन, विषुव, षडशीति ही नांवें आहेत. यावरून वेदांगज्योतिषकालींच किंवा त्यानंतर लवकरच कांतिवृत्ताचा द्वादशधाविभाग प्रचारांत आला होता. परंतु ग्रहस्थिति नक्षत्रांवर सांगितलेली आढळते. यावरून ग्रहस्थिति बारा राशींच्या संबंधे सांगण्याची पद्धति सुरू झाली होती असे दिसत नाही. मेषादि संज्ञा श. पूर्वी ५०० च्या सुमारास प्रचारांत आल्या. वार त्यापूर्वी आले. ते परदेशांतून आले. ४३२०००० वर्षांचे महायुग ही युगपद्धति यास्काच्यापूर्वीची असावी. अथवज्योतिषावरून दिसते की स्वतंत्रपणे जातकपद्धति आमच्या देशांत उत्पन्न झाली होती. सारांश ग्रहस्पष्टस्थितीचे गणित आणि जातक यांचे बीज वेदांगकालाच्या अंतीं उत्पन्न झाले होते. ते ग्रंथरूपानें कसें परिणत झाले ह्याचे विवेचन आतां दुसऱ्या भागांत येईल.