पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्यायदर्शन. ८७ पूर्वांग, न्यायाचा सिद्धान्त; त्याचे स्वरूप, आणि न्यायोत्तरांग अशी प्रकरणे ह्या आन्हिकांत आली आहेत. यांत ४१ सूत्रे आहेत. दुसऱ्या आन्हिकांत बाकी राहिले वादादिक सात पदार्थांची लक्षणे सांगितली आहेत. कथा, हेत्वाभास, छल आणि दोषलक्षणे, अशी चार प्रकरणे ह्यांत आहेत. सूत्रसंख्या २०. दुसऱ्या अध्यायाचे पहिल्या आन्हिकांत ६८ सूत्रे आहेत. त्यांत संशयाचे विशेषपरीक्षण केले आहे,आणि वर सांगितलेल्या चार प्रमाणांत प्रामाण्य नाही, अशी कोणी शंका घेऊन ती प्रमाणे प्रमाणेच नव्हत, असे प्रतिपादन करील तर त्याचे निराकरण येथे केले आहे. संशय, प्रमाणसामान्य, प्रत्यक्ष, अवयव, अनुमान, वर्तमान, शब्दसामान्य आणि शब्दविशेष अशी आठ प्रकरणे या भागांत आहेत. दुसऱ्या आन्हिकांत चारच प्रमाणे नाहीत, कारण ऐतिह्य (परंपरेने आलेली माहिती, ज्ञान, दन्तकथा ), अर्थापत्ति, संभव, अभाव, इत्यादि दुसरी अनेक प्रमाणे विद्वानांनी मानली आहेत. यासाठी प्रमाणे चार आहेत असे म्हणता येणार नाही,अशी शंका कोणी काढील तर त्यास उत्तर या आन्हिकांत दिले आहे, ऐतिह्याचा शब्दप्रमाणांत अन्तर्भाव होतो. अर्थापत्ती वगैरेचा अनुमानांत अन्तर्भाव होतो, असे येथे प्रतिपादिले आहे. प्रमाणचतुष्टय, शब्दनित्यत्व, शब्दपरिणाम आणि शब्दपरीक्षा अशी चार प्रकरणे या आन्हिकांत येतात. सूत्रं. ६७.