पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमीमांसा. की, एकाद्या विशिष्ट शास्त्रावर कोणी ग्रन्थ लिहिला, तर त्या ग्रंथांत त्या शास्त्राविषयी माहिती किंवा ज्ञानविस्तार जितका असतो, त्याहून ग्रंथकर्त्याच्या अंगी अधिक ज्ञान असते. उदाहरणार्थ पाणिनीनी व्याकरणशास्त्रांत जितकी माहिती दिली आहे त्याहून त्यांच्या अंगी खरोखर अधिक ज्ञान होतें. अशी जर गोष्ट आहे, तर या जगांतील सर्व चराचर वस्तूंचा विचार करणारे व सर्व ज्ञानाची खाणच होऊन रहाणारे हे जे ऋग्वेदादि शास्त्र ज्या महाभूताने सहज लीलेने उत्पन्न केले व जे त्याचें केवल निश्वसित आहे, असें श्रुति सांगते, अशा या महाभूताचे ( ब्रह्माचें ) सर्वज्ञत्व व सर्वशक्तिमत्त्व निरतिशय आहे, त्याच्यासारखें सर्वज्ञ व सर्वशक्ति असे दुसरे कोणीहि नाही, हे सांगावयास नकोच. 'शास्त्रयोनि' हा बहुव्रीहि समास आहे, असे मानून ब्रह्मांची योनि ( प्रमाण ) शास्त्र आहे असाहि अर्थ या सूत्राचा करतात; सर्वज्ञ ब्रह्माचे अस्तित्व वेदावरून सिद्ध होते असा या सूत्राचा अर्थ होतो. पूर्वीच्या सूत्रांत याच अर्थाचें प्रतिपादन केले आहे. परंतु येथे पुनः हे सांगण्याचे कारण असे आहे की, पूर्वीच्या सूत्रांत प्रत्यक्ष अक्षरांनी तो अर्थबोध झाला नव्हता, म्हणून अनुमानदर्शकच तें सूत्र आहे, अशी समजूत होण्याचा संभव आहे. अशी समजूत होऊ नये म्हणून प्रत्यक्ष शब्दांनी वेद हे ब्रह्माचे प्रमाण आहे, असे येथे सांगितले आहे.