पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. वे. शा. सं. रा. वासुदेव शास्त्री अभ्यंकर फरगसन् कॉलेजांतील गुरु यांच्या जवळ माझे काही मित्र सर्वदर्शन संग्रहाचें अध्ययन करीत होते. त्या प्रवचनांचे श्रर.गाचा लाभ मला काही दिवस मिळाला. त्यावेळी मधुसूदनसरस्वतीकृत ' प्रस्थानभेद ' ह्या नांवाचा लहानसा संस्कृत ग्रन्थ माझ्या पाहण्यांत आला. ह्या ग्रंथांत दिलेली माहिती मराठीत लिहून प्रसिद्ध केली तर त्यापासून आपल्या समाजांतील पुष्कळ जिज्ञासु लोकांस फायदा होईल असे वाटून, हे पुस्तक लिहिण्यांस मी आरंभ केला. मूळ ग्रन्थ अगदी लहान असल्यामुळे त्याचे भाषान्तर केले असते, तर हवी तितकी माहिती देतां आली नसती. म्हणून प्रस्थानभेदांतील माहितीहून अधिक माहिती मिळविण्यासाठी मला अनेक मराठी, संस्कृत व इंग्लिश पुस्तकें धुंडाळावी लागली आणि माझ्या विद्वान मित्रांपासून वारंवार माहिती मिळवावी लागली, या सर्वांचे आभार मी मनःपूर्वक मानतों. नामनिर्देशाने सर्वांचे आभार पृथक् पृथक् मानणे येथे अशक्य आहे, तथापि वे. शा. सं रा. रा. वासुदेव शास्त्री अभ्यंकर यांचे प्रवचनांचा लाभ मला झाल्याबद्दल त्यांचे आभार मानणें अवश्य आहे. तसेच वे. शा. सं नारायण शास्त्री मराठे वाईकर हे भाद्रपदमासी पुण्यास आले होते, त्यावेळी त्यांनी माझे हस्तलिखितांत मंत्राचे स्वरासंबन्धी झालेल्या चुक्या मला दाखविल्या आणि न्याय वैशेषिक दर्शनावरच्या ग्रन्थांची नांवें सांगितली, म्हणून त्यांचाहि मी आभारी आहे.