पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 तुमच्या बदलीनंतर शहरात जाहीर नागरी निरोप समारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने निरोप देताना निवासी उपजिल्हाधिकारी गहिवरले होते, तेव्हा तुम्ही अवघ्या दोन मिनिटात शांतपणे सर्वांचे सहकार्याबद्दल आभार मानून निरोप घेतला. भावभिजल्या प्रदीर्घ भाषणाची आमची अपेक्षा. पण तुम्ही कमळाप्रमाणे पाण्यापासून अलिप्त रहाणाऱ्या जातीचे. आम्हीच तुमच्यामध्ये नको तेवढे गुंतलो होतो.

 आजही तुमच्यासोबत तेव्हा काम करणारे तेवढेच गुंतलेले आहोत. माझी खात्री आहे. पण तरीही तुमच्या तटस्थतेचे अनुकरण करीत आहोत. पण आज परिस्थितीच एवढी विपरीत आहे की, तुमच्या ध्येयमार्गाप्रमाणे चालताना दमछाक होते. प्रसंगी तत्त्वाला मुरड घालावी लागते. डोळ्यासमोर कातडे ओढत, काही गोष्टी समजल्याच नाहीत असे दर्शवावे लागते. आपण पण हताश, उदास, निराश तर झालो नाहीत ना अशी कधी शंका येते. छे! असा विचार मनात आलाच कसा? म्हणून मी स्वत:वरच रागावतो. माझ्या हातून हे पत्र कधीच पोस्ट होणार नाही. कारण तुमच्यावर लिहिण्याच्या बहाण्याने माझी मलाच शोधण्याचा हा अल्पस्वल्प प्रयत्न आहे. तुमच्या परिपूर्णतेच्या ध्यासात तो बसणार नाही, याची मला कल्पना आहे. म्हणून ते मी माझ्याजवळच ठेवणार आहे. आणि दरवर्षी शिक्षक दिनी ते वाचून तुम्हाला माझे प्रशासनातले आदर्श गुरू म्हणून वंदन करीत भावांजली वाहणार आहे.

प्रशासननामा । ९५