पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



गर्दीचं मानसशास्त्र आणि प्रशासन




 पश्चिम महाराष्ट्रात शिंगणापूरची यात्रा ही एक महत्त्वाची व भाविकांची प्रचंड गर्दी होणारी यात्रा. चंद्रकांतची तेथे प्रशिक्षण कालावधीमध्ये चार महिन्यासाठी, अनुभवासाठी, तहसीलदार म्हणून नियुक्ती झालेली.

 महसूल खात्याच्या शिरस्त्याप्रमाणे चंद्रकांतनं पोलीस, परिवहन व आरोग्य आदी विभागांची बैठक घेऊन यात्रेची तयारी केली. ग्रामपंचायतीशी चर्चा करून मंदिर परिसर व गावात यात्रेकरूंच्या दर्शनाची व्यवस्था केली.

 चंद्रकांतला त्याचे सर्व अधिकारी पुन्हा पुन्हा आश्वस्त करत होते की, ‘सर, शेकडो वर्षांची यात्रेची परंपरा आहे, कावड घेऊन येणाऱ्या यात्रेकरूंचा क्रम, शिरस्ता ठरलेला आहे, त्याची एक परंपरा व संकेत निर्माण झाले आहेत. त्यानुसार यात्रेकरू शांतपणे व शिस्तीत दर्शन घेतात व कावडीचं पाणी महादेवावर घालून यात्रेची भक्तिपूर्ण वातावरणात सांगता होते. आपण काळजी करू नका. सारे व्यवस्थित होईल.'

 उपअधीक्षक दर्जाचे पोलिस अधिकारी पण चंद्रकांतला अशाच पद्धतीने आश्वस्त करत होते. 'पोलिसांचा बंदोबस्त चोख आहे. यात्रा पूर्णपणे शांततेत पार पडेल.'

 यात्रेची सुरुवात भक्तिपूर्ण वातावरणात झाली. चंद्रकांत तेथील तलाठ्यास घेऊन गावात फिरून यात्रेची व्यवस्था पाहात होता. बसेसची पार्किंगची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय नीट झाली आहे का याचा त्यानं जातीनं पाहणी करून घेतली. मग तो वर मंदिराच्या परिसरात आला. यात्रेकरू शांततेमध्ये दर्शन घेत होते. मुंगी घाटातून अनेक कावडी येत होत्या. परंपरा व संकेताप्रमाणे त्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जात होता.

 तासाभराच्या पाहणी दौ-यानंतर चंद्रकांत आश्वस्त झाला. यात्रा नीटपण पार पडेल अशी आता त्याला खात्री वाटत होती. नवी नियुक्ती, कोणताही पूर्वानुभव नाही, त्यामुळे तो गेले काही दिवस अधिक सावध होता. पण पूर्ण

९६ । प्रशासननामा