पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 चंद्रकांतच्या ध्यानात या प्रकरणामागचं स्वार्थी राजकारण आणि भ्रष्टाचार आला होता. त्याला पुष्टी दिली ही तहसीलदार आणि पोलीस इन्स्पेक्टरांनी. त्यांनी तासाभरात तलाठी व पोलीस काँस्टेबलमार्फत सर्व माहिती जमा केली होती.

 मिटींग संपल्यावर चंद्रकांतने कलेक्टर आणि एस. पी. ना सर्व प्रकार कथन केला.

 ‘हा सारा बनाव सरपंचाचा आहे. त्याला येणारी आमसभा या प्रश्नावर गाजवायची आहे आणि आपलं नेतृत्व तालुका स्तरावर प्रस्थापित करायचे आहे. या धिंडीमुळे त्याचा वचक वाढून तो म्हणेल ते काम अधिकाऱ्यांना करावं लागेल, यासाठी त्याची ही कृती असावी. वृत्तपत्रांतून अशा प्रकारांना प्रसिद्धी मिळते. असो. हा झाला त्यांचा राजकारणाचा भाग. आपल्यासाठी दुसरा भाग महत्त्वाचा आहे. तो आहे त्यात गुंतलेल्या भ्रष्टाचाराचा व हितसंबंधाचा. अधिगृहीत करायच्या विहिरींची मालकी जरी दुसऱ्याच्या नावे असली तरी तिच पाणी सरपंच आपल्या दहा एकर ऊस शेतीसाठी वापरतोय. ते पाणी शासनानं ताब्यात घेऊन टंचाई निवारणार्थ वापरलं तर त्याचं नुकसान फारसं होणार नाही. कारण त्याच्या ऊसाला पुरेसे पाणी देऊनच उर्वरित पाणी आपण वापरणार होतो; पण त्याचा खरा रस आहे, टेपररी वॉटर सप्लाय स्कीमअंतर्गत सात किलोमीटर पाईपलाईन टाकून पाणी घेण्यामध्ये. कारण याचं टेंडर त्यांनाच मिळणार आहे. तिन्ही निविदा त्यांनीच वेगवेगळ्या नावांनी भरल्या आहेत. टेंडर मंजूर होईल अशी त्यांना खात्री असावी, म्हणून त्यांनी त्याचं कामही वर्क ऑर्डर मिळण्यापूर्वीच तीन दिवसापासून सुरू केलं आहे. त्यामुळे ते खानोलकरावर चिडले होते. त्यांचा स्वार्थ आणि गुत्तेदारीतून मिळणाऱ्या नफ्याआड येणारा खानोलकरांचा पर्याय आपण मान्य करणार, याची त्यांना खात्री होती. म्हणूनच त्यांनी धिंड काढून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. धिस इज ए व्हेरी सिरियस ब्लो टू द मोराल ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन अँड गव्हर्नमेंट ऑफिसर्स.

 कलेक्टरांनी सल्लामसलत केली आणि आदेश दिला.

 ‘एस. पी. साहेब, डी. वाय. एस. पी. ला व्हॅन देऊन टाकळीला पाठवा. ज्यांनी ज्यांनी धिंडीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेतला त्या साऱ्यांना पकडा. सरळपणे शरण येत नसतील तर लाठी चालवायला, ठोकून काढायला मागे-पुढे बिलकूल पाहू नका. दोन तासात त्यांना जिल्हा मुख्यालयात पकडून आणा. सरपंच व त्यांच्या प्रमुख साथीदारांना अटक झालीच पाहिजे. त्यांना चँप्टर केसखाली रिमांड केलं जाईल हे पाहा.'

४६ । प्रशासननामा