पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ते चंद्रकांतला म्हणाले, 'तुम्हीही डी. वाय. एस. पी. सोबत जा आणि योग्य ती कारवाई करा.'

 अर्ध्या तासात चंद्रकांत टाकळीला पोहोचला.

 डी. वाय. एस. पी. सावंत म्हणाले,

 ‘सर, डी. एम. साहेबांपुढे मला बोलता आलं नाही; पण लाठीमार म्हणजे अती होईल. मी सरपंचांना व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्याना जरूर पकडेन; पण'

 'नाही सावंतसाहेब, मी डी. एम. शी पूर्ण सहमत आहे. एका कार्यक्षम अधिकाऱ्यांची गाढवावरून धिंड काढणे हा प्रशासनाला आव्हान देण्याचा प्रकार आहे. पुढील तीन महिन्यांत दुष्काळाची तीव्रता वाढत जाणार आहे. त्यावेळी आजच्या दहापट कामे रात्रंदिवस राबून करावी लागतील, त्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना खेडोपाडी रात्री-अपरात्री हिंडावे लागेल, ते कशाच्या भरवशावर दौरे व काम करतील? आपण काही प्रभावी कृती केली नाही, तर त्यांचं नीतिधैर्य खचेल... सावंतजी, यावेळी वाजवीपेक्षा थोडं अधिक निष्ठुर व कठोर व्हायचं. साऱ्या गावाला दहशत बसेल असं लोकांना झोडपून काढायचं. कारण सारं गाव धिंडीत सामील होतं आणि एकालाही विरोध करावासा वाटला नाही. खानोलकरांचा सवाल कुणालाही खटकला नाही की, गावकऱ्यांना ऊस शेतीला पाणी हवं का तहानेसाठी?'

 व्हॅनमधून उतरलेले पन्नास पोलीस हुकूम मिळताच गावकऱ्यांना धरून कैद करू लागले. गावकरी पळायचा वा सुटकेचा प्रयत्न करू लागले तर त्यांचा पाठलाग करीत पकडू लागले आणि मुख्य म्हणजे विरोधाच्या नावाखाली, तो मोडून टाकण्यासाठी म्हणून स्वैर लाठीमार करू लागले. सरपंचाला शेतात गाठून पकडून आणले. ते अजूनही गुर्मीत होते. धमकीवजा स्वरात सावंतला म्हणाले,

 'तुम्हाला या दडपशाहीचा जाब द्यावा लागेल. हा प्रश्न विधानसभेत येईल. विरोधी पक्षाचे आमदार आमच्या गावचे आहेत. त्यांनाही गावात राहायचे आहे. एकेक अधिकारी सस्पेंड होतील, तेव्हा तुम्हाला आमचा इंगा कळेल.

 सरपंच संतापानं वेडेपिसे झाल्याप्रमाणे किती वेळ तरी बरळत होते.

 सायंकाळी पत्रकारांना बातमीचा सुगावा लागताच कलेक्टरांकडे धाव घेतली. तोवर चंद्रकांतनं या घटनेच्या संदर्भात सविस्तर टिपणी काढून, टाईप करून ठेवली होती, ती पत्रकारांना वाटली. या प्रकारामागचे राजकारण व सरपंचाचे भ्रष्टाचार प्रकरण स्पष्ट करण्यात आले. शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेली वस्तुस्थिती वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय होती. सरपंचांनी पण स्वतंत्र

प्रशासननामा । ४७