पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘सॉरी फॉर इंटरप्शन सर.' पुन्हा खानोलकरांचा रोखठोकपणा जागा झाला होता. ‘सरपंचसाहेबांना कदाचित माहिती नसेल; पण माझी खात्री आहे. त्या विहिरीला पुरेसे पाणी आहे. हवं तर मी उद्या समक्ष टाकळीला येतो. पाणी जर साचलं असेल तर उपसा करून स्वच्छ करतो आणि साठा किती आहे हे गावकऱ्यांना दाखवून देतो. सात लाखांची स्कीम; तीही महिन्यासाठी करण्यापेक्षा विहीर अधिगृहीत करण्याचे काम काही हजारात होईल. हा पर्याय उपलब्ध झाला नाही तर आज ३० टक्के लोकसंख्येला कमी पडणारं पाणी टँकरने देऊ शकू. मे-जून अखेरपर्यंत, तरीही खर्च लाखापर्यंत जाणार नाही. मग ही खर्चिक, टेंपररी, सात लाखांची स्कीम हवी कशाला?'

 सरपंच निघून गेले. बैठक संपली.

 चंद्रकांत खानोलकरांना म्हणाला,

 ‘सरपंचापुढे हे सारं बोलून दाखवायची काय गरज होती? आम्हाला नंतर कल्पना द्यायची. राजकारणी धुरंधर लोकांपुढे आपले पत्ते पूर्णपणे कधीच खोलायचे नसतात. हे यापुढे तरी लक्षात ठेवा. माझी एक एक मित्र व सहकारी अधिकारी म्हणून तुम्हांस विनंती आहे.'

 अँटी-चेंबरमध्ये खानोलकर टाकळीमधील प्रसंग सांगत होते.

 'सर, मी टाकळीला पोहोचलो. पाणी पुरवठ्याच्या विहिरीजवळ गेलो. तेथे सरपंच, काही कार्यकर्ते व गावकरी असे पन्नासजण होतो. मी त्यांना विहीर समक्ष दाखवली. ती स्वच्छ होती आणि इंजिन बसवून तिचं पाणी ऊसाला दिलं जात होतं. मी साऱ्यांसमक्ष त्यांना सवाल केला, हे पाणी ऊसाला द्यायचं का तुमच्या तहानेला? हे ठरवा. माझ्या या प्रश्नानं सरपंचांचं पित्त खवळलं असावं. त्यानं तावातावानं वाद घातला, ‘या विहिरीचे पाणी गावाला दोन दिवसही पुरणार नाही. हे साहेब स्वत:ला शहाणे आणि आम्हाला मूर्ख समजतात. आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही, हे खरं की नाही?' गावक-यांनी हो म्हटले. तसं सरपंचानं आक्रमकपणे त्यांना चक्क चिथावणी द्यायला सुरुवात केली. पाहता काय? हे जे अधिकारी आहेत त्यांना चांगली अद्दल घडवली पाहिजे.' मला काही कळण्याअगोदरच माझ्या गळ्यात आधीच तयार करून ठेवलेली चपलांची माळ घातली. एकानं डांबर फासलं आणि मला उचलून चार-सहा जणांनी चक्क गाढवावर बसवलं. ढोल ताशे वाजवीत, चिखलाच्या पाण्याचे सपकारे मारीत पूर्ण गावात धिंड काढली. त्या दोन तासात मी दहा वेळातरी मनोमन मेलो असेल. हा डाव योजनापूर्वक आखण्यात आला होता. त्यामागे सरपंचांचा मतलब असणार.

प्रशासननामा । ४५