पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 निरोप समारंभात अधिकाऱ्यांच्या 'पर्सनल अजेंडा' राबवण्याच्या वृत्तीवर चंद्रकांतनं सूचकतेनं टीका केली होती. त्याच्या डोळ्यासमोर आयुक्तच होते. त्यांचे आयुक्तपदावरील कारकिर्दीचे एकमेव लक्ष्य होतं; रोजगार हमी कामावरील भ्रष्टाचाराची प्रकरणं हुडकून काढणं, प्रोसिजरल (कार्यात्मक) चुका दिसल्या तर धडाधड निलंबन आणि विभागीय चौकशी अशा कठोर उपाययोजना करण्याची त्यांना हौस होती. प्रशासकीय वर्तुळात ते त्यामुळे कमालीचे बदनाम होते. त्यामुळे विकास कामे, विशेषत: रोजगार हमीची कामे ठप्प झाल्यात जमा होती. चौकशीच्या व भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या भीतीनं कोणीही ती सुरू करण्याची हिंमत करत नव्हता. क्रुसेडिंग वॉरियर' (तमा न बाळगता बळी जाण्यासाठी सज्ज असणारा योद्धा) अशी स्वत:ची प्रतिमा त्यांना प्रिय होती. नार्सिससप्रमाणे ते तिच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे साक्षरता अभियान, जलसंधारणाची कामे आदी विकासात्मक कार्यक्रमात त्यांना रस नव्हता.

 चंद्रकांतला नव्या शोभेच्या पदावर अवमानित होत रुजू व्हावं लागलं. पुरवठा, महसूल आदी विभागाच्या उपायुक्तपदावर त्याच्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी कार्यरत होते. करमणूक कर विभागाला आयुक्त पातळीवर निर्णय प्रक्रियेत, पदाचे स्वरूप पाहता, काहीच स्थान नसल्याने चंद्रकांत अडगळीत फेकल्याप्रमाणे तेथे चार महिने होता. दररोज अस्वस्थ व बोअर होत होता. पदोन्नतीवर महत्त्वाच्या जिल्ह्यात बदलीनं त्याची अवमानित दुर्लक्षित अवस्था चार महिन्यांनी एकदाची संपुष्टात आली.

 वाचकहो, या कथानकासाठी तपशील जरासा बदलला असला तरी मूळ प्रसंग व त्यामागचं अधोरेखित प्रशासकीय तत्त्व सत्य आहे. आणि मुख्य म्हणजे सार्वत्रिक आहे. चंद्रकांतसारख्या अधिका-यांना त्याचा फटका बसतो. ज्यांना राजकीय गॉडफादर नाही, ठरावीक जातीची व लॉबीची कवचकुंडलं नाहीत व मनीपॉवर नाही त्यांना निमूटपणे या अशा बदल्यांना सामोरे जावं लागतं.

 एक वरिष्ठ अधिकारी चंद्रकांतचे स्नेही आहेत. आजच्या प्रशासनाच्या एका कटू बाबीवर झगझगीत प्रकाश पाडत ते म्हणाले होते, प्रशासनात सब घोडे बारा टक्के असं एक अलिखित तत्त्व वरिष्ठ गृहीत धरतात. कारण त्यामुळे त्याची अ‍ॅथॉरिटी वाढत असते आणि खालचे अधिकारी त्यांच्या दडपणयुक्त दबावाखाली येतात. तुमचं महत्त्व आणि एखाद्या पदावर असणंही त्याच्या मर्जीची बाब ठरते. त्यांच्या लेखी तुमचे विशेष गुण वा इतर कुणाचं गुणरहित सर्वसाधारण असणं यात फरक नसतो. कारण खुर्चीची ताकद व प्रतिष्ठाच (काही महत्त्वाच्या पदांच्या संदर्भात) एवढी महान असते की, तिथं सामान्य,

४0 । प्रशासननामा