पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बिनकामाचा माणूसही वर्ष-सहा महिने सहजपणे निभावून नेऊ शकतो. आणि काही पदे अशी अडगळीची असतात की तेथे नियुक्ती झाली तर कनिष्ठ कर्मचारी व आम नागरिक पण 'हा अधिकारी अकार्यक्षम' आहे अशीच समजूत करून घेतात. प्रशासनात उगवत्या सूर्याला पूजणारेच बहुसंख्य असतात. तुझ्यासारख्या गुणवंताला तू उच्चपदी असताना ते झुकून सलाम ठोकतात, बेसुमार तारीफ करतात. पण साईडपोस्टला असलं की चक्क पाठ फिरवतात. हे सूत्र कधीच विसरायचं नाही.'

 आजच्या स्पर्धात्मक, मुक्त बाजारी अर्थ व समाजव्यवस्थेत गुणवत्तेला मिळणारे स्थान लक्षात घेता ही ‘सब घोडे बारा Gटक्के' ची, वरिष्ठांची स्वत:चे महत्त्व वाढणारी, बेदरकार व आम झालेली वृत्ती प्रशासकीय कामाला खीळ घालणारी व लालफितीला जन्म देणारी आहे. अर्थव्यवस्था मुक्त करूनही परदेशी गुंतवणुकीचं प्रमाण देशात अपेक्षेप्रमाणे वाढलेले नाही; त्याचं हे एक प्रमुख कारण आहे. जिथं गुणवत्तेचं महत्त्व जाणलं जात नाही, तिथं प्रशासनात गतिमानता कशी येईल?

 ब्रिटिश परंपरेनुसार ‘ब्युरॉक्रसी' ही ‘फेसलेस' व तटस्थ असावी. त्यातील ‘फेसलेस'च्या विरुद्ध अतिप्रसिद्धीचा सोस अनेक अधिका-यांत वाढत चालला आहे, त्यात ते राजकीय नेत्यांशी स्पर्धा करू लागले आहेत. ही चिंतनीय बाब आहे. काही प्रमाणात समाजमान्यता ही जोमाने काम करण्यासाठी टॉनिकसारखी ठरते. पण तिची लक्ष्मणरेषा विसरता कामा नये. नोकरशाही तटस्थ असावी. या अर्थानं, की ती घटना, विधिमंडळ व कायद्याशी बांधील असावी. व्यक्ती, पक्ष व राजनिरपेक्ष असावी. आम्ही प्रशासकांनी तटस्थ' चा अर्थ उदासीन असा घेतला, आज जी अनास्था व बेपर्वा दिसून येते, त्याचे हेच कारण आहे. भ्रष्टाचारी व नि:स्पृह, धडाडीचे व मंद, सामाजिक बांधिलकी मानणारे व राज्यकर्त्यांना केवळ सलाम ठोकणाच्या अधिकाऱ्यांना एकाच तराजूत मोजणारे जर वरिष्ठ अधिकारी असतील; अनास्था, लालफितीचा कारभार आणि प्रशासनातील उदासीनता व्यापक राहणार असेल तर नवल कसले? त्याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे हे निश्चित.

प्रशासननामा । ४१