पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बोलण्यातून नव्हे तर कृतीतून मुस्लीम समाजावर प्रभावीपणे बिंबविण्यात यश मिळवले. निमित्तमात्र तो डाव्या विचाराचा नगरसेवक ठरला, तरी मनोमन कुठेतरी मुस्लीम समाजमन रस्त्याच्या ऐहिक गरजेच्या निर्णयाप्रत येऊन ठेपले होते. त्याला चंद्रकांतने आवाहन केले, तेव्हा अनुकूल प्रतिसाद मिळाला.

 या प्रश्नाचा एक जटिल पैलू म्हणजे अनधिकृतपणे रस्ते अडवून वा सार्वजनिक ठिकाणी मंदिर, मशिद, पुतळे वा मदरसा यासारख्या धर्मसंस्था उभारण्याची वाढती प्रवृत्ती. साऱ्या समाजाची व प्रशासनातील धार्मिक वृत्तीच्या स्थानिक अधिकाऱ्यांची अशा धर्मस्थळांच्या बांधकामासाठी मूक संमती असल्यामुळे त्यांची उभारणी होते. प्रशासनासाठी ती कायमची डोकेदुखी ठरतात. ती पाडणे वा स्थलांतरित करणे हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असतो. शंभरपैकी नव्याण्णव प्रकरणात ही धार्मिक बांधकामे कायम राहतात. प्रस्तुत प्रकरणासारख्या एखाद्या ठिकाणी ती हटवली जातात. एरव्ही दंगली होतात, तणाव वाढतो.

 सतत तीन टर्म निवडून येणाऱ्या मराठवाड्यातील एका आमदाराला निवडणुकीत जबर आव्हान निर्माण झाले. त्यावर यशस्वीपणे मात करून चवथ्यांदा निवडून येण्याचा त्याने विक्रम केला. त्यासाठी त्याने अभिनव अशी पुतळा स्ट्रेटेजी वापरली. तो स्वतः मराठी. ती मते पक्की होती. विरोधी उमेदवार मागासवर्गीयांत लोकप्रिय होता. त्यावर मात करण्यासाठी त्याने एक अफलातून उपाय शोधला. मतदारसंघात मातंग व दलितांची मते बरीच होती, त्यांना आपलंसं करण्यासाठी त्याने चक्क ठोक भावाने अण्णाभाऊ साठे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाचपन्नास अर्धपुतळे बनवून घेतले आणि प्रत्येक गावात त्यांच्या वस्तीत जाऊन ते पुतळे भेट दिले. पुतळे देताना आश्वासन दिले, 'मी निवडून आल्यावर चौथरा, भोवताली बगीचा व बांधकामासाठी आमदार फंडातून मदत करीन. तोवर तुम्ही कच्चा चौथरा उभारा व पुतळा बसवा.'

 त्याची ही पुतळा 'स्ट्रॅटेजी’ यशस्वी ठरली व तो भरघोस मताने निवडून आला.

 गणेशोत्सव, शिवजयंती, नवरात्र महोत्सव, आंबेडकर जयंती व आता वाढीस लागलेली अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव हे अनेक दिवस चालतात. महसूल व पोलीस प्रशासन वर्षातून किमान चार महिने तरी अशा महोत्सवाच्या बंदोबस्तात गुंतून पडलेले असतात. त्यासाठी समाजाला अप्रत्यक्षपणे फार मोठी किंमत मोजावी लागते.

 वाचकहो, शहरातील तो रस्ता पूर्ण झाल्यावर त्याचा समारंभही स्थानिक

प्रशासननामा । ३३