पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमदारांच्या हस्ते थाटात पार पडलाय; पण सुदैवानं त्या रस्त्याला कुणातरी देशभक्त पुढाऱ्याचे वा गेला बाजार दिवंगत नगराध्यक्ष - नगरसेवकाचे नाव देण्याचे कुणाला सुचले नाही. समारंभानंतर आमदार प्रांजळपणे म्हणाले, 'या रस्त्याला एकच नाव सार्थ राहील', 'सर्वधर्मसमभाव रस्ता किंवा सेक्युलर रोड..! बरोबर ना?' त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला.

चंद्रकांत मात्र त्यांच्या कथनातील सत्यदर्शनानं घायाळ होत होता. त्यांच्याकडे टाळीला प्रतिसाद न देता सुन्नपणे पाहतच राहिला.

वाचकहो, तुमचं काय मत आहे? त्या रोडला तुम्हीही ‘सेक्युलर रोड' म्हणणार ना?

३४ । प्रशासननामा