पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुरवठा अधिकारी म्हणून तुझ्याकडे माझे लक्ष वेधले गेले. दहा वर्षांपूर्वीचा मी मला तुझ्यात दिसला. एक समान जोडणारा दुवा मला मिळाला आणि तू मला जवळचा सुहृद वाटू लागलास.

 खाडी युद्धानंतर औरंगाबादला मी जिल्हा पुरवठा अधिकारी होतो. पुरवठा विभागातील भ्रष्टाचार आणि काळाबाजार याविरुद्ध जणू युद्धच पुकारले होते. सामान्य नागरिकांचा एक आंतरिक पाठिंबा अशावेळी मिळतो याची जाणीव झाली होती. दुर्दैवाने माझी फार लवकर, तडकाफडकीने बदली झाली, पण आजही केरोसिन टंचाई झाली, रेशन दुकान वा ग्राहक हितसंरक्षण क्षेत्रात समस्या आल्या की, नागरिक माझी आठवण काढतात, असं अनेकांनी मला सांगितले आहे. ही बाब धडाक्याने काम करायला बळ देते.

 तूही असाच आहेस मित्रा! प्रशासन हा आपला स्वधर्म मानून, निष्ठेने काम करणारा आणि त्यामुळेच जिल्ह्यात कडक वागूनही लोकप्रिय झालेला! तुझ्यामाझ्यात फरक एवढाच आहे की मी केवळ "प्रोफेशनल एथिक्स" पाळून हे पदसिद्ध काम आहे, असे समजून गांधीजींच्या विश्वस्त भावनेला प्रमाण मानून काम करत आलो आहे. तर तुझी व्यावसायिक नीतिमत्ता ही तुझ्या अंगात भिनलेल्या वारकरी परंपरेतून आलेली ‘स्वधर्मनिष्ठा' आहे, त्यामुळे 'अधिकारी माऊली' असा तुझा लौकिक झाला. वारकरी संप्रदायाची खूण म्हणून गळ्यात माळ घालून वावरणारे अनेक नेते व अधिकारी मी पाहिले आहेत. पण त्यांचे वर्तन व भ्रष्टाचार बघून, मला त्यांच्यातील दांभिकपणा जाणवून ॲलर्जी झाली होती.

 तू इथे जिल्हापुरवठा अधिकारी म्हणून बदलून येण्यापूर्वी मी तुझ्याबद्दल ऐकलं होतं, पण तुझ्या गळ्यातील माळ आणि तुझ्या बोलण्यातले ज्ञानेश्वरीचे संदर्भ पाहून मी थोडासा अस्वस्थ झालो होतो. कारण आपल्या पुरवठा खात्यात पूर्वी एक माळकरी अधिकारी होता, त्याच्या भ्रष्टाचाराचे व अन्यायाचे किस्से मराठवाड्यातील प्रत्येक गावात मशहूर होते. त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्यावर सबळ पुराव्यानिशी त्याच्यावर मी कार्यवाही केली. तेव्हा त्याने माझ्यावर नाना आरोप केले. त्याकाळात तुझ्याकडे पाहून व राजासाहेबांच्या आठवणीने मला मानसिक बळ मिळालं होतं. हे कबूल केलं तर तुला कदाचित आश्चर्य वाटेल. मित्रा! एका अर्थानं राजासाहेबांप्रमाणे तूही माझा गुरूच आहेस. ज्युनिअर असलास तरी, कारण, तुझ्या वर्तनानं आणि विचारानं मला अनेकदा प्रशासनाच्या अंधारलेल्या वाटा प्रकाशमान झाल्याचा अनुभव आला आहे.

 भारतीय समाजात किंवा प्रशासनात काय, शेकडा ९०% भ्रष्ट व अन्यायी

प्रशासननामा । १५९