पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असले तरी १०% हे नक्कीच चांगले व न्यायी असतात, पण बहुतेक वेळा ते ‘अनसंग हिरोच' असतात. फक्त उच्चपदस्थ आय.ए.एस. वा आय.पी.एस. अधिकारी प्रसारमाध्यमाचे लक्ष वेधून गेतात. तुझ्यासारखे अधिकारी जिल्हा व गावपाळीवर, प्रत्यक्ष ग्रामीण क्षेत्रात काम करून, शासनाच्या ध्येयधोरणांची काटेकोर अंमलबजावणी करून गोरगरीब वर्गाला न्याय देत असतात आणि प्रशासनाचा तोल सावरत असतात - ते मात्र अंधारातच राहतात. मला अशा ‘अनसंग हिरो'ना न्याय द्यायचा आहे. खास करून तुला. कारण त्यातला सर्वात चांगला, कार्यक्षम आणि नीतिमूल्ये पाळणारा, अंतर्बाह्य स्वच्छ अधिकारी तू आहेस. म्हणून प्रशासननामाचे हे एक पुष्प मी तुझ्या नावाने वाचकांपुढे वाहत आहे.

 शासकीय अधिकारीच काय, पण आजकाल सर्व सुशिक्षित अभिवादन करताना “हॅलो' असं सहजतेने म्हणतात, तुझा उत्स्फूर्त ‘रामराम' ऐकला, की हे पाणी काही वेगळंच आहे असे जाणवते. भारतीय परंपरेचे सत्त्व घेऊन आलेला तू त्यांचा प्रतिनिधी आहेस, असे मला वाटते.

 वारकरी घराण्याची परंपरा तुला वारसाने मिळाली आणि ती तुझ्या रक्तात सहजतेनं भिनली गेली. ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाची जोड व्यवहारात, आचरणात तू आणीत राहिलास. तुझ्यात स्वधर्मनिष्ठा प्रखर आहे. त्यापुढे मृत्यूचीही पर्वा तुला वाटत नाही, हे मला दिसले, तेव्हा काळजीनं मी तुझ्या जिल्ह्याच्या कलेक्टरांशी बोललो आणि पोलीस संरक्षण दिले, तो हृद्य किस्सा मला नेहमी आठवतो.

 तू पुरवठा खात्यातील काळाबाजार रोखण्यासाठी अचानक भेटी व धाडसत्र सुरू केले. रेशन दुकानदार, केरोसीन एजंट व पेट्रोलपंपचालक तुझ्या जाळ्यात सापडू लागले. तेव्हा तुला रात्री-अपरात्री धमक्यांचे फोन येऊ लागले. 'आम्ही तुला मारून टाकू. ट्रकखाली चेंदामेंदा करू. तुझ्या मुलाचं अपहरण करू.' त्यावेळी फोनवर तू शांतपणे म्हणायचास, ‘मला किंवा माझ्या कुटुंबातील कोणाला मृत्यू देणं किंवा न देणं तुमच्या हातात नाही. माझं आयुष्यच जर आता संपलेलं असेल तर तू केवळ निमित्तमात्र ठरशील आणि ते संपलेले नसेल तर तू काय करणार? तू माझा बालही वाकडा करू शकणार नाहीस. मी तझ्या धमक्यांना भीक घालणार नाही आणि फोन ठेवताना त्यांनाही तू ‘रामराम' म्हणायचास.

 मी तातडीने तुला पोलीस संरक्षण घे असे सुचवले. तेव्हा तू म्हणालास, "सर, त्याची गरज नाही. माझ्या ओठावर ज्ञानेश्वर माऊलीच्या ओळी असतात.

१६0 । प्रशासननामा