पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



एक वारकरी अधिकारी



 प्रिय मित्रा,

 माझाच अल्टर इगो असलेल्या इनसायडरने वर्षभर ‘प्रशासननामा'च्या माध्यमातून प्रशासनातले अनुभव व चिंतन वाचकांपुढे मांडले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय प्रशासनाची घालून दिलेली चौकट आज किती खिळखिळी झाली आहे, हे त्यातून काही अंशी तरी जाणवले असणारच. प्राप्त अधिकारांचा माज आल्याप्रमाणे गैरवापर, भ्रष्टाचार व ज्यांच्या सेवेसाठी आपली नोकरी आहे व सुविधा-अधिकार शासनाने दिले आहेत, ते विसरून वागणं व सामान्य माणसाच्या समस्यांविषयी अनास्था व बेपर्वाईची वृत्ती... या तीन बाबींमुळे शासकीय अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन व कलंकित झाली आहे. पण अधिकाऱ्यांना त्याची जाणीव नाही किंवा त्याकडे ते मुद्दामच कानाडोळा करतात. 'प्रशासननामा'तील प्रत्येक लेख ही अशा अपप्रवृत्तींचा पर्दाफाश करणारी एकेक बखरच आहे. या बखरीचा शेवट मी तुझ्यावर लिहून करणार आहे. हेतू एकच आहे, तो म्हणजे प्रशासनरूपी गर्द अंधाराच्या बोगद्याच्या शेवटी काही दिवे लुकलुकणारे आहेत व ते मार्ग दाखवीत आहेत, ही जाणीव व्हावी म्हणून. गतवर्षी मी पाच सप्टेंबरला माझ्या प्रशासकीय गुरूंबद्दल लिहिले होते. ते भारतीय प्रशासन सेवेतील बडे अधिकारी होते. पण मित्रा! तुझ्याबद्दल लिहिताना विशेष आत्मीयता वाटते. कारण माझ्या हाताखालच्या अधिकाऱ्यांमध्ये असाही एक अंतर्बाह्य, स्वच्छ, कार्यक्षम आणि खरंखुरं अध्यात्म जगणारा अधिकारी आहे. मित्रा! माझ्यातला दहा वर्षांपूर्वीचा मी तुझ्यात मला दिसतो आणि जेव्हा जेव्हा माझ्या प्रशासकीय जीवनात कसोटीचा वा आत्मपरीक्षणाचा प्रसंग येतो, तेव्हा प्रशासकीय गुरू राजासाहेब यांचे बोल, किंवा तुझ्या कृतीतून वा संभाषणातून झरणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या मला आठवतात आणि बळ प्राप्त होतं. मनातली किंकर्तव्यमूढ अशी अवस्था नाहीशी होते. पुरवठा उपआयुक्त म्हणून माझ्या विभागातील एक जिल्हा

१५८ । प्रशासननामा