पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कलेक्टरांनी त्यांच्या विधानाला कोणत्याही प्रकारे ‘रिॲक्ट' न होता चंद्रकांतला विचारले,

 "तुझं काय मत आहे?"

 काही क्षण चंद्रकांत स्तब्ध होता, मग हलकेच म्हणाला,

 "आपल्या जिल्ह्यातील घटना किंवा मराठवाड्यात काही ठिकाणी घडलेल्या घटना घ्या. सर्वत्र कर्फ्यू असताना हिंसक प्रकार घडले आहेत. भोसकल्यामुळे काही बळी गेले आहेत. म्हणजेच मुस्लीम मानस प्रक्षुब्ध होतं व ते कर्फ्यू ही जुमानत नव्हतं. पुन्हा आपल्या विभागात मदरसा ही संस्था वेगानं फोफावते आहे हे विसरून चालणार नाही. तेथे फॅनाटिझमचे धडे कोवळ्या व तरुण पिढीला दिले जातात. त्यांच्या भावना भडकणं स्वाभाविक आहे, कवडेंनी त्याला वाट देण्याचा विचार केला. त्यांनी दिलेली उपमा सार्थ आहे. प्रेशर कुकरची शिटी सैल होऊन कोंडलेल्या वाफेला वाट दिली नाही तर स्फोट होऊ शकतो. हा तालुका स्फोटक व संवेदनाक्षम आहे. त्यामुळे कर्फ्यूतही हिंसक प्रकार घडले असते. प्रोसेनशला सर्व खबरदारी घेऊन परवानगी देणं ही कॅलक्युलेटेड रिस्क होती. अशी रिस्क घेण्याचे धैर्य किती अधिकारी दाखवितात? ती हिंमत कवडे व मराठे यांनी दाखवली. अर्थात हद्दपार केलेले आणि ‘डी’ गॅंगशी संबंध आलेले पाच तडीपार गुंड अचानक आत घुसले व त्यांनी दंगल पेटवली. अन्यथा मोर्चा शांततेत पार पडला असता. वातावरण झपाट्यानं निवळले असतं. खैर. त्यांचं जजमेंट थोडं चुकलं. तडीपार गुंडांचा अँगल त्यांच्या ध्यानी आला नाही. तो वरिष्ठांच्याही ध्यानात आला नसता. तो ध्यानात आला नाही म्हणून त्यांना दोष देणे योग्य होणार नाही."

 तो पुढे म्हणाला, “म्हणून मी एस.पी.साहेबांशी सहमत होऊ शकत नाही. या दोन अधिकाऱ्यांना सस्पेंड न करता त्यांच्या पाठीशी वरिष्ठांनी ठामपणे उभे रहावे, असे माझे मत आहे."

 जिल्हा मुख्यालयात ते पोचले तेव्हा वार्ताहर त्यांची वाटच पाहत होते. त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. त्यांचा सामना करीत कलेक्टर म्हणाले,

 “घडलेली घटना दुर्दैवी असली तरी ‘डी’ गॅंगशी संबंधित तडीपार गुंडांमुळे हा प्रकार घडला असे तपासाअंती आढळून आले आहे. पण त्याही परिस्थितीत तहसीलदार व पोलीस इन्स्पेक्टर यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळली व योग्य ती उपाययाजेना केली. त्यामुळे अत्यंत कमी विध्वंस झाला आहे. बळी पडलेले दोन्ही तडीपार गुंड होते. त्यांची नावे मी जाहीर केली तर तुम्हालाही ते मान्य होईल. त्यामुळे कुणाही निरपराध माणसाचा प्राण गेलेला नाही. जे पाच जखमी

१५६ । प्रशासननामा