पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "मेलेले दोघेही मुस्लीमच होते ना?' एस.पी.पुटपुटले.

 "उद्या पेपरवाले आणि बाबरी बचाव कमिटीचे लोक आरोप करणार की पोलिसांनी टिपून मुस्लिमांना मारले."

 कलेक्टर शांतपणे ऐकत होते. चंद्रकांत त्यांच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया पाहात होता. कवडे कमालीचे भेदरले होते. विभागीय चौकशी मागे लागली तर चारदोन वर्षे पेन्शन बोंबलली. शिवाय इज्जतीचा फालुदा.

 “ठीक आहे मि. कवडे, हे आपण नंतर पाहू. आता शांतता समितीची बैठक घेऊन लोकांना आवाहन करू. पुढील चारसहा दिवस डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. ओ.के.?"

 शांतता समितीमध्ये कलेक्टरांनी आवाहन केलं. “आजची हिंसक घटना का व कशी घडली याची जरूर आम्ही दंडाधिकारीय चौकशी करू. पण ती ही वेळ नाही. याक्षणी शांततेची व सौहार्दाची गरज आहे. सर्व जखमींना आम्ही औषधोपचार करू, जाळपोळीत ज्यांच्या घरे-दुकानांना झळ पोचली आहे त्यांना नियमाप्रमाणे मदत करू. तिचे वाटप उद्याच होईल."

 कलेक्टर पंजाबी होते. त्यांचे उर्दूवर प्रभुत्व होते. त्यांनी कुराण-हादिसचे दाखले देत आणि शेर सुनावीत लोकांच्या भावनांना हात घातला.

 "हिंदु-मुसलमान एक है, रास्ते दो हुवे तो क्या हुवा! मंजिल एक है।" असा फडकता शेर सुनावला, तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य विसरून काहींनी ‘वा, बहोत खूब' म्हणत उत्स्फूर्त दाद दिली.

 “मघाशी शहरात येताना टुरिंग टॉकीजवर एक पिक्चरचं पोस्टर पाहिलं. अभिताम बच्चनच्या 'हम' पिक्चरचं. “उसका मेसेज अच्छा है. हम जो दो दिल, दो इन्सान और दो कौम को मिलाता है, हम मधलं पहिला अक्षर आहे 'ह' - जे माझ्या मते हिंदूचे प्रतीक आहे, तर दुसरं अक्षर आहे 'म' म्हणजे मुसलमान. मतलबकी बात यह हुवी की हिंदू का 'ह' और मुसलमान का 'म' मिलावो तो 'हम' बनता है, हम यानी मैं और तू-हम और तुम -हमसब एक है-ये बताने की जरूरत नही."

 त्यांनी भावनेला हात घालीत साऱ्याना शांत केलं. त्यानंतर एस.पी.बोलले. शेवटी आभाराच्या निमित्तानं चंद्रकांतनही हिंदी कवितांचा आधार घेऊन भाईचाऱ्याचं व सौहार्दाचे आवाहन केलं.

 परतीच्या प्रवासात एस.पी. म्हणाले, “सर, तुमचा तहसीलदार व आमचा इन्स्पेक्टर या दोघांनाही सस्पेंड केलं पाहिजे. त्यांनी प्रोसेशनला कोणत्याही परिस्थितीत परवानगी द्यायला नको होती."

प्रशासननामा । १५५