पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/155

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तीन वर्षांपूर्वी तहसीलदार म्हणून येथे रुजू झाले होते. एक कर्तबगार व धडाडीचा महसूल अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता, तो या प्रकरणानं मातीस मिळाला होता. त्यामुळे ते साहजिकच अस्वस्थ होते.

 त्यांनी सारा प्रकार सविस्तरपणे कथन केला.

 "सर, परवा दुपारीच आर.डी.सी. साहेबांनी बाबरी मशीद पडत असल्याची खबर दिली. त्यावेळेपासूनच १४४ कलम लावले. रात्रीचा कर्फ्यूही होता. पण इथले मुस्लीम कमालीचे प्रक्षुब्ध झाले होते! काल-परवा दोन्ही दिवस मशिदीमशिदीतून खलबते होत होती. इथल्या शाही दर्ग्याच्या मुतवलीनं मोर्चा काढून शासनाकडे निषेध नोंदवण्याची परवानगी मागितली तेव्हा, मी ती नाकारली होती. पण आज पुन्हा त्यांनी विनंती केली. नाराजीला वाट दिली तर पेटलेली तरुण पिढी शांत होईल असे वाटले, सर, एक प्रकारे हा प्रेशरकुकरचा सेफ्टी व्हॉल्व्ह जरा सैल करून, कोंडलेली वाफ काढून देण्यासारखा प्रकार होता. काल रात्री दोन भोसकण्याचे व चार सुरामारीचे प्रकार कर्फ्यू असतानाही घडले होते."

 “पण कवडे, अशावेळी कडक कर्फ्यू एनफोर्स केला पाहिजे. अधिक पेट्रोलिंग करून सर्व समाजकंटक पकडले पाहिजेत."

 “ते तर मी केलंय सर. तरीही हा निर्णय मी व पोलीस निरीक्षक मराठेनी मिळून घेतला. परिस्थितीचा सांगोपांग विचार करून घेतला. मुख्य म्हणजे मुतवली व शहरातील उपनगराध्यक्ष (जे मुस्लीम समाजाचे आहेत) त्यांनी कुराण शरीफची कसम खाऊन शांतता राखण्याची हमी दिली होती. मोर्चातील एक-एक माणसाची झडती घेऊन तो नि:शस्त्र आहे याची आम्ही खात्रीही केली होती."

 “मग मोर्चा एकदम हिंसक कसा झाला? अर्ध्या रस्त्यातून लोकांनी जाळपोळ लुटालूट का सुरू केली? '

 इतका वेळ शांत उभे असलेले पोलीस निरीक्षक मराठे म्हणाले,

 'मी त्याची माहिती काढली आहे सर. एका वळणावर गल्लीतून चारपाच जणांचं एक टोळकं मोर्चात सामील झालं. ही हद्दपार केलेली गुंड पोरं- त्यात तीन मुस्लिम व दोन हिंदू. त्यांचा दाऊद इब्राहिम टोळीशी मुंबईला गेल्यानंतर संबंध आला होता. त्यांनी सोबत तलवारी व सुरे आणले होते. एकाजवळ रॉकेलचा डबा व पेटते पलिते होते. त्यांनी जाळपोळ व दगडफेक सुरू केल्यानंतर इतका वेळ शांत असलेला जमाव बेकाबू झाला आणि..."

 “सर, हे जे दोन लोक मृत्युमुखी पडले ते हद्दपार केलेलं गुंड होते. दाऊद टोळीशी संबंधित होते." कवडे म्हणाले.

१५४ । प्रशासननामा