पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/140

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



समाजमनाची विकृती



 'रोम जळत असताना नीरोनं फिडल वाजवीत बसावं, तसा हा संतापजनक प्रकार आहे. सारा मराठवाडा किल्लारीच्या प्रलंयकारी भूकंपानं व हजारो लोक मृत्युमुखी पडल्यामुळे शोकाकुल असताना आमच्या कलेक्टरांना मात्र साक्षरता अभियानाच्या मीटिंग घेण्याचे सुचत आहे.'

 जिल्ह्यातील एका लोकप्रिय सत्ताधारी नेत्याचे हे उद्गार सर्व वृत्तपत्रात ठळक मथळ्यांसह प्रसिद्ध झाले होते. किल्लारी - उमरग्याच्या भूकंपाचा आज चवथा दिवस होता. अजूनही वृत्तपत्रात पानेच्या पाने भरून त्या भयंकर दुर्घटनेची चित्रे व बातम्या येत होत्या. त्या बातम्यांमध्ये चौकटीतील ही बातमी वाचकांना प्रशासनाबद्दल संतप्त करीत होती.

 चंद्रकांत त्या बातम्या वाचून अस्वस्थ झाला. त्या दिवशी कलेक्टर संतोष सिंग हे एका तालुक्यावरून दौरा आटोपून दुपारी कार्यालयात येणार होते. त्यांचा हा दौराही साक्षरता अभियानाच्या संदर्भात होता.

 हा दिवस साप्ताहिक साक्षरता अभियान बैठकांचा होता. कलेक्टरांनी सर्व जिल्हा प्रमुखांना एक-एक तालुका या कामासाठी वाटून दिला होता. त्या तालुक्यात आजच्या दिवशी सर्व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्याचा व पुढील कार्यक्रम ठरविण्याचा होता. त्यानुसार चंद्रकांतने मुख्यालयात बैठक घेतली होती.

 बैठकीच्या वेळी काही शिक्षकांनी हा प्रश्न उपस्थित करून म्हटले, "सर, जरी आपल्या जिल्ह्यात भूकंपाची तीव्रता नसली व जीवितहानी झाली नसली तरी भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वत्र, खास करून ग्रामीण भागात लोक भीतीनं घराबाहेर उघड्यावर झोपत आहेत, आणि सारं जनजीवन ठप्प झालं आहे. आपले साक्षरतेचे वर्गही बंद पडले आहेत. अशावेळी हा अट्टाहास का?”

 ‘मला परिस्थितीची कल्पना आहे!'

 चंद्रकांत शांतपणे म्हणाला, 'म्हणूनच आजच्या बैठकीचे प्रयोजन आहे.

प्रशासननामा । १३९