पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/141

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काल शहरात एका नामांकित भूकंपशास्त्रज्ञाचे व्याख्यान होते. त्यात त्याने भूकंपाची शास्त्रीय कारणे सांगून आता नजीकच्या भविष्यात पुन्हा भूकंपाचा महाराष्ट्राला धोका नाही असे स्पष्ट केले आहे. ही माहिती आम्ही एका पत्रकात संकलित केली आहे. त्याच्या प्रती तुम्हाला आज मिळतील. त्या आधी आपणापुढे सायन्स कॉलेजचे एक प्राध्यापक विवेचन करतील. ते आपण समजून घेऊ व प्रत्येक गावात साक्षरता केंद्रामध्ये पुढील आठ दिवसात त्याची माहिती देऊन जनतेच्या मनातील भूकंपाची निराधार भीती काढायचा प्रयत्न करू. साक्षरता अभियानानंतर साक्षरोत्तर कार्यक्रम आपणास पुढील वर्षी घ्यायचा आहे. त्यात कार्यात्मक साक्षरता ही कल्पना आहे. लोकांना जीवनोपयोगी व्यावहारिक माहिती व ज्ञान देणे म्हणजेच कार्यात्मक साक्षरता. त्याची आज आपण सुरुवात करणार आहोत असे समजा.'

 चंद्रकांतच्या स्पष्टीकरणानं अनेक शिक्षक स्वयंसेवकाचं समाधान झालेलं दिसले नाही. तेव्हा तो पुन्हा म्हणाला, 'हे पहा, एक अरिष्ट होऊन गेले आहे. लातूर, उस्मानाबाद मधील ५०-६० गावांचे भारी नुकसान झाले आहे. पण आपल्या मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात थोडीफार पडझड झाली आहे, एवढचं! त्यामुळे बावरून जाण्याचं कारण नाही. प्रशासनाने जनतेला धीर दिला पाहिजे व जनजीवन सुरळीत केले पाहिजे. त्यासाठी हा खटाटोप आहे. साक्षरता केंद्रात निरक्षर, प्रौढ, स्त्री-पुरुष आहेत. त्यांना भूकंपाबद्दल सत्य माहिती देणे यामुळे सुलभ होईल!'

 त्या नामांकित शास्त्रज्ञाने भूकंपावर रंगीत पारदर्शिकेच्या मदतीने सप्रयोग व्याख्यान दिले होते. ते व्याख्यान ध्वनिमुद्रित करण्यात आले होते. चंद्रकांतला अचानक एक कल्पना सुचली! त्याने कलेक्टरांना म्हटले,

 ‘सर, आपल्या जिल्ह्यात जीवितहानी झालेली नाही, पण लोकांच्या मनात भय आहे. पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसतील... त्यांचा हा भ्रम व्याख्यानाने बऱ्याच अंशी दूर झाला आहे. पण हे सारे मुद्दे गावात पोचवायचे असतील तर उद्याच्या साप्ताहिक तालुका बैठकीत शिक्षकांना या व्याख्यानाच्या आधारे माहिती देऊ. म्हणजे ते साक्षरता केंद्रावर पुढील आठवड्यात जाऊन व्याख्याने देतील. आणि लोकांच्या मनातील भीती दूर करायचा प्रयत्न करतील.'

 ‘गुड! व्हेरी गुड!' कलेक्टर म्हणाले.

 ‘याचा दुसरा फायदा म्हणजे साक्षरता वर्ग बंद पडणार नाहीत.'

 पण यावर लोकप्रतिनिधींची ही विचित्र प्रतिक्रिया आली होती. त्या पुढाऱ्यानं चक्क पत्रकार परिषद घेऊन प्रशासनावर टीकेची झोड उडवली.

१४० । प्रशासननामा