पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आरोपी बलदंड राजकीय पुढाऱ्याचा बिघडलेला मुलगा आहे व त्याला वाचविण्याचा खटाटोप चालू आहे, म्हणूनच अजूनही तो फरार आहे. फुले, कर्वे, आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यात स्त्रीची अब्रू आज किती स्वस्त झाली आहे. त्यांचं सोयरसुतक आज कुणालाच नाही याचा मला तीव्र खेद वाटतो."

 कलेक्टरांनी साऱ्यांचं बोलणं झाल्यावर उत्तर देताना म्हटलं, “तुमच्या संतप्त भावना मी समजू शकतो आणि झाला प्रकार निंद्यच आहे. त्याबाबत प्रशासन संवेदनशील जरूर आहे. आरोपी लवकरच पकडले जातील. आम्ही प्रशासकीय अधिकारीही सामाजिक कार्यकर्त्यांच्या भावनेनेच याकडे बघतोय."

 औरंगाबादहून आलेल्या एका बोलभांड महिला कार्यकर्तीनं हेटाळणीच्या सुरात म्हटले, “अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते ? जस्ट इम्पॉसिबल. प्रशासन हे नेहमीच सत्ताधाऱ्यांचं बटीक राहिलं आहे. अन्यायाकडे डोळेझाक करीत राहिलं आहे."

 “तुमचं हे जनरल विधान असेल तर मला काही म्हणायचं नाही." कलेक्टर तरीही संयम बाळगून होते. पण आवाजाला थोडी धार चढली होती, "पण रोख आमच्याकडे असेल तर एवढंच म्हणेन, तुम्ही माहिती न घेता पूर्वग्रहदूषित नजरेतून पाहात व बोलत आहात. मोर्चा काढला, दोन तास कंठाळी भाषणं दिली, चार लेख पेपरात लिहिले म्हणजे झालं? या बलात्काराच्या रूटकॉजकडे आपण पाहता काय? त्याच्या निर्मूलनासाठी काही स्ट्रॅटेजी, लाँग टर्म प्लॅनिंग व प्रबोधनासाठी काही कार्यक्रम पण आखावा व अंमलात आणावा लागतो. याचा आपण विचार केला आहे?"

 ती कार्यकर्ती अवाक् झाली. अधिकाराचा तोराच मिरवणारे अधिकारी तिने आजवर अनुभवले असल्यामुळे कलेक्टरांचं विधान तिला चकित करून गेलं.

 तेव्हा हस्तक्षेप करीत भाऊसाहेब म्हणाले,

 “आम्ही विश्वास ठेवतो की, आपण जातीने लक्ष घालत आहात व आरोपी लवकरच पकडले जातील. पण त्याची ओळख परेड घेणाच्या अधिकाऱ्यांनाही योग्य त्या सूचना द्या. कोर्टातही प्रकरण नीट उभे राहील, याची काळजी घ्या, अशी समस्त महिला वर्गाच्या वतीने मी विनंती करतो."

 “जरूर, भाऊसाहेब. मी तुम्हाला कलेक्टर म्हणून तसाच एक माणूस म्हणूनही शब्द, नव्हे वचन देतो. गेल्या आठवड्यात हे वासनाकांड घडल्यापासून मी विचार करतो आहेच. तरुण मुलामुलींमध्ये निकोप मैत्री नसणं आणि सेक्सकडे

प्रशासननामा । १२३