पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्या दोघींना त्यांनी शहरातल्या बड्या हॉटेलात मटणाचं सामिष भोजन दिलं होतं. त्याचवेळी त्यांना माहीत नसलेलं पेयही थोडं पाजलं. “ते काय व्हतं माहीत नाय मला, पण तेची चव नाय आवडली पहिल्या झूट. पण तेंनी मोप आग्रव केला, म्हणूशान आम्ही दोघी गुमान ते पियेलो."

 भोजनानंतर ते तिघे या दोघींना घेऊन सिटीलाईटमध्ये चित्रपटाला गेले. बी व सी ग्रेडचे मल्याळी व तामिळी व सेक्सी हिंदी व इंग्रजी सिनेमे तिथे दाखवण्यात येत. त्यासाठी ते टॉकिज कुविख्यात होतं. तिथं एक सॉफ्ट पोर्नोग्राफिक सिनेमा चालू होता. सिनेमानंतर रात्री बारा वाजता त्या दोघींना रेल्वे स्टेशनावर सोडण्यासाठी ते गेले होते. ट्रेन आधीच निघून गेली होती. म्हणून रेल्वे गेस्ट हाऊसमध्ये चला म्हणून त्यांनी त्या दोघींना गुड्स यार्डात नेलं व आळीपाळीने बलात्कार केला.

 कलेक्टरांनी लक्ष घातल्यामुळे तपासाची चक्र वेगाने फिरू लागली. त्या तिघा संशयित आरोपींपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश मिळालं. त्यांच्या जबानीतून हा सारा प्रकार प्रदीपनं (माजी जिल्हा अध्यक्षाच्या पुत्रानं) रचल्याचे निष्पन्न झालं. तो व त्याचा मित्र फार फरार झाले होते.

 वृत्तपत्रांनी हे वासनाकांडाचं प्रकरण लावून धरल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. पण आरोपी पकडले जात नव्हते. त्यामुळे पोलीस व जिल्हा प्रशासनावर टीका होत गेली. त्याची गांभीर्याने दखल घेत कलेक्टरांनी पोलीस अधीक्षकांना व पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले,

 "तुम्ही माजी अध्यक्षांना भेटून तपास करायचा प्रयत्न केला आहे. त्यांना आज पुन्हा भेटा व सक्त वॉर्निग द्या की, जर तीन दिवसात प्रदीप आपणहून पोलिसांपुढे हजर झाला नाही तर त्याला पळून जाण्यास व फरार होण्यास मदत केली म्हणून तुम्हाला अटक केली जाईल. माझा होरा आहे की, हे तंत्र यशस्वी ठरेल."

 कलेक्टरांची ही जालीम मात्रा लागू पडली. 'प्रदीप पोलिसांना शरण येईल. त्याला दोन दिवसांची मुदत द्या' असं अध्यक्षांनी सांगितलं. त्यानुसार प्रदीप आज शरण यायला हवा होता. तो जर शिष्टमंडळाच्या भेटीपूर्वी पोलीस ठाण्यात हजर झाला तर संवेदनक्षम प्रशासनाचा पुरावाच देता आला असता.

 पण तसं घडलं नाही. प्रदीप हजर होईपर्यंत त्याची वाच्यता करणंही गैर होतं. म्हणून कलेक्टरांनी शांतपणे महिलांच्या संतप्त भावनांना तोंड दिलं. भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळातील महिला एकामागून एक टीकेचे आसूड ओढत होत्या.

 "प्रशासनाचा तोंडावळा तसेच मनोरचनाही पुरुषीच आहे कलेक्टरसाहेब,

१२२ । प्रशासननामा