पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विकृत दृष्टीनं पाहणे हे अशा वाढत्या बलात्कारांचं मूळ कारण आहे. पुन्हा राँग मॅनहूडची कल्पना याच्यामागे आहे. आज आधुनिकतेच्या नावाखाली स्त्री देहाला सिनेमा, टि.व्ही.मधून फॅशनच्या नावाखाली ज्या पद्धतीने प्रदर्शित केलं जातं, त्यामुळे तिला ‘ऑब्जेक्ट ऑफ डिजायर' वा अधिक ब्लंटली सांगायचं झालं, तर उपभोगाची वस्तू म्हणून पेश केलं जातं. तरुण कोवळी मनं त्यामुळे भ्रष्ट होत आहेत. या सामाजिक समस्येची व्यापकता किती आहे याची कल्पनाही करता येणार नाही, एवढं त्याचं भयानक रूप झालं आहे. शिक्षण, नोकरीमुळे स्त्री अधिक मुक्त होत आहे, तिचा सार्वजनिक जीवनात वावर वाढला आहे, पण पुरुषी मनोवृत्तीत फारसा पड़क पडला नाहीये. उलट, या आधुनिकतेच्या विकृत कल्पनेमुळे आणि वाढत्या चंगळवादामुळे स्त्रीवर अन्याय वाढत आहेत, याचा समाजाने विचार करण्याची वेळ आली आहे."

 “आपले निरीक्षण मार्मिक व अचूक आहे. पण यावर तुम्ही काय उपाय सुचवाल?" भाऊसाहेब कलेक्टरांच्या प्रतिपादनाने चांगलेच प्रभावित झालेले दिसत होते.

 “मी इथल्या कॉलेजच्या उपप्राचार्यांशी बोललो आहे व काही दिवसांतच काही कॉलेज युवकयुवतींसाठी प्रबोधन शिबीर आयोजित करणार आहोत. त्यात निकोप मैत्री, स्त्री-पुरुष समानता आणि निरोगी नैसर्गिक लैंगिकता याबाबत व्याख्याने, चर्चा व दृकश्राव्य माध्यमाच्या आधारे नवा विचार देण्याचा प्रयत्न करणार आहोत."

 “दुसरी बाब असहकार, निषेध व पिकेटींगची. भाऊसाहेब, मी तुम्हाला गांधीमार्ग सांगावा एवढा मी मोठा खचितच नाही. असे प्रकार घडण्यामागे, खास करून सत्ता व संपत्ती असणाऱ्या वडिलांचे स्वत:चे सैल वर्तन आणि मुलांवर कळत नकळत केले जाणारे चुकीचे संस्कार आहेत. प्रस्तुत प्रकरणात काय घडले? माजी अध्यक्ष आपली सामाजिक प्रतिष्ठा व राजकीय प्रभावाचा त्याला वाचवण्यासाठी वापर करत आहेत, पण त्यात ते सफल होणार नाहीत हें नक्की. पण आजही ते समाजात उजळ माथ्याने कसे वावरू शकतात? आणि मुख्य म्हणजे लोकही त्यांना उद्घाटन, सत्कार सोहळ्याला का निमंत्रण देऊन बोलावतात? लोक त्यांच्या हस्ते पारितोषिक व हार-तुरे कसे घेतात? त्यात त्यांना संकोच, लज्जा का वाटत नाही? अशा बेजबाबदार समाजद्रोही माणसावर आपण सामाजिक बहिष्कार का नाही घालत? का नाही तुम्हीं आज त्यांच्या घरावर मोर्चा नेत? भाऊसाहेब, हे सामाजिक बहिष्काराचं जालीम अस्त्र वापरायच असेल तर तुमच्यासारख्या विवेकी व साधनशुचिता मानणाऱ्या गांधीवादी नेत्यांनीच

१२४ । प्रशासननामा