पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रस्त्यांनी गाव पांढरीच्या साच्या ओळखी पुसून टाकल्या. ठेले गेले. स्टॉप्स आले. गावं गेली, ती स्टेज झाली. हे सारं बदललेलं जग चित्रित करून डॉ. पुष्पपाल सिंह यांनी माणसाच्या गमवलेल्या इतिहास व संस्कृतीची नोंद केली आहे.

 डॉ. चंदा सोनकर-काशीद यांनी या ललित निबंधांचा केलेला अनुवाद मराठी वाचक डोळ्यांसमोर ठेवून केलेला असल्याने मूळ हिंदी आशयाचे त्यांनी योग्य मराठीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा अनुवाद शब्दप्रमाण म्हणता येणार नाही. पण रूपांतरही ते नव्हे. मूळ सामग्री यथातथ्य पोहोचवण्याचा हा प्रयत्न होय. अनुवाद करताना स्रोत भाषा व लक्ष्य भाषा यात फार अंतर आणले तरी सौंदर्य व वस्तुनिष्ठतेचे द्वंद्व सुरू होते. ते अंतर यथातथा ठेवण्याचा प्रयत्न केल्याने या अनुवादास मूळ कृतीचे सौंदर्य प्राप्त झाले आहे.

 अलीकडच्या काळात जागतिकीकरणास सर्रास नावे ठेवली जातात. पण अनुवादास जागतिकीकरण हे वरदान ठरले आहे याचा विसर पड़ता। कामा नये. मराठी साहित्यात तर अनुवादाच्या आलेल्या त्सुनामीमुळे ललित लयाला गेलं अशी स्थिती आहे. मौलिक लेखन करणारे वळचणीत व अनुवादक सेलिब्रिटी होत आहेत. गमावण्याचा हिशोब करत असताना काय कमावले हे ही पाहायला हवं. लेखकांचे महत्त्व जाऊन प्रकाशक शिरजोर होण्याचा काळ हा! त्याचाही वेळीच हिशोब व्हायला हवा. लेखक सार्वभौम याचे विस्मरण झाले तर प्रतिभा संपेल. प्रतिभा संपेल तर लालित्य, लालित्य गेले तर उरतील मुळाक्षरे! अक्षर, शब्दांना परब्रह्माचं रूप कल्पना, कला, संगीत, लय, आशय, विचार, संदर्भ, मिथकांच्या समन्वयाने व प्रसंगतः उपयोगाच्या विवेक व बुद्धिमत्तेने येते. अलीकडे चित्रकाराचे काम डीटीपी ऑपरेटर ग्राफिक्सच्या सुबोध प्रयत्नाने करताहेत. प्रकाशक केवळ किफायती विचाराने लेखक, कलाकारांना पैशाने जोखताना दिसतात. साहित्य, संमेलन, जाहिरात, विक्री, मुद्रण, उत्पादन, बांधणी, संयोजक साच्या शब्दांना जागतिकीकरण पैशाने तोलू लागलं आहे. ही धोक्याची घंटा वेळीच ऐकू आली तर त्यात सर्वांचे हित आहे. लेखकवाचकातलं संपलेलं अद्वैत साहित्य व्यवहारातील सर्वाधिक ऐरणीवरचा विषय आहे. याचे भानही या निमित्ताने व्हावे. ती पण गमावलेल्या इतिहास व संस्कृतीचीच नोंद आहे हे विसरून चालणार नाही.

◼◼


१८-५-२०११

कोल्हापूर,

प्रशस्ती/९७