पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

बालविकासाच्या वादळवाटा (लेखसंग्रह)
अतुल
आनंदराव देसाई, फणसवाडी, जि. कोल्हापूर
प्रकाशन - जुलै, २०११
पृष्ठे - ७४ किंमत - ५0/
______________________________________

बालदीप जपणे म्हणजे भविष्य सोनेरी करणे

 ‘बालविकासाच्या वादळवाटा' हे छोटेखानी पुस्तक वंचित बालकांविषयी अतुल देसाई यांच्या मनात असलेल्या अस्वस्थता व तळमळीतून साकारले आहे. तो स्फुट लेखांचा संग्रह होय. श्री. देसाई यांच्या घराण्यात समाज कार्याची परंपरा आहे. त्यांचे वडील ए. के. देसाई, परिवीक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते त्या काळात आम्ही भेटत असू. वडिलांची परंपरा प्रेरणा घेऊन अतुल देसाईही परिवीक्षा अधिकारी होऊन बालकल्याण क्षेत्रात आले. त्यांनी सध्या आपले कार्यक्षेत्र बदलून बांधकाम व्यवसाय चालविला आहे. परंतु त्यांची ओढ बालकल्याणामध्ये आहे.
 ब-याचदा माणूस पोटासाठी एक काम करत राहतो. परंतु त्याचे ‘अंतरीचे धावे' मात्र त्याच्या प्रिय क्षेत्रात रुंजी घालत राहतात. अतुल देसाईंचा कल बालकल्याणाकडे असल्याने व व्यवसायातील मिळकतीचा काही भाग व आयुष्याचा काही काळ बालकल्याणासाठी खर्च करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. स्वप्ने माणसास स्वस्थ बसू देत नसतात. स्वप्नांची अस्वस्थता हीच साहित्याची जननी असते. त्याप्रमाणे अतुल देसाई यांनी बालकल्याण विषयक लेख लिहिले. ते वृत्तपत्रात प्रकाशित झाले. त्याचे संकलित रूप म्हणजे ‘बाल विकासाच्या वादळवाटा!'
 महाराष्ट्रात बाल्य उपेक्षित राहिले. त्यातही अनाथ, निराधार, बालगुन्हेगारांच्या वाट्याला केवळ उपेक्षाच आली नाही तर अवहेलनाही!


प्रशस्ती/९८