पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाटील या उभयतांचे जीवन कार्य लेखकाने अगदी जवळून पाहिले आहे. अनुभवलेही आहे. त्यांनी ही दोन्ही कार्यकर्ती मंडळी जशी भावली तशी चितारली आहेत. दोघांच्या दलितोद्धाराच्या कार्याच्या दिशा स्वतंत्र आहेत. अमरनाथ कांबळेचा मार्ग रचनात्मक तर बापूसाहेबांचा तो संघर्षाचा. अमरनाथ सतत समाजशील राहिले. बापूसाहेबांचा मूळ पिंड चळवळीचा. विद्यार्थी दशेपासून ते संगठन, संघर्ष करीत राहिले. समाजकारणास बापूसाहेबांनी राजकारणाची जोड दिली. अमरनाथ ‘टिपिकल' तर बापूसाहेब ‘टिपिकल' समाजसेवक. प्राचार्य सातवेकरांनी दोहोतला फरक मोठ्या कौशल्याने चित्रित केला आहे.

 आजच्या सामाजिक व राजकीय जीवनातील कोणतंही भाषण राजर्षी शाह छत्रपती महाराज यांचे नाव वगळून करता येत नाही. पण सुमारे पन्नास वर्षांपूर्वी असं नव्हतं. छत्रपती शाहूंचे लोकोत्तर कार्य व कर्तृत्व समाजास प्रथमतः प्रकर्षाने व प्रभावीपणे जाणवून दिले ते पी. बी. साळुखे यांनी. त्यांनी शाहू जन्मशताब्दीच्या निमित्ताने संपादिलेला गौरवग्रंथ याचा पुरावा. पी. बी. साळुखे व्यासंगी अभ्यासक होते. तसे वक्तेही. समाजकारण व राजकारणाचं बेमालूम मिश्रण करून त्यांनी आपला बहुजनवाद कसा जोपासला हे शाहूशाहिराच्या या संग्रहातील व्यक्तिचित्रावरून लक्षात येते. कोल्हापूरच्या मोठ्या माणसांची यादी कै. पी. बी. साळुखेच्या अंतर्भावाशिवाय पुरी करता येत नाही. हे सदरचे शब्दचित्र वाचले की कळते नि पटतेही. हे सारं लेखकाच्या शैलीचे श्रेय!

 आपल्या ‘आक्का', 'नाना' नि ‘निवृत्ती' या कुटुंबीयांची ‘वास्तव मधील रेखाचित्रे ही मोठी जमेची बाजू आहे. आज एकविसाव्या शतकात कोण कुणाचं न राहण्याचा काळ जवळ येऊन ठेपत असताना विसाव्या शतकात माणसं आत्मिक आकांतांनी दुस-यासाठी, आप्तेष्टासाठी जीवाची कुरवंडी कशी करायची ते वाचलं म्हणजे 'गेलं शतक माणसांचं होतं, चालू शतक यंत्रांचं आहे. या विधानाचा प्रत्यय येतो. यातील ‘आक्का' वाचत असताना, माझ्यासारख्या कधी काळी अनाथ असलेल्यास आपणास अशी आक्का भेटती तर...' वाटणं हेच या व्यक्तिचित्राचे यश वाटतं. अनेक दोषांसह 'नाना'साठी लेखकाने केलेली पायपीट अन् शेवटचा ‘नाऽ ऽ ना' म्हणून फोडलेला टाहो प्रत्येक संवेदनशील वाचकाचे हृदय हेलावून सोडल्याशिवाय राहणार नाही. निवृत्तीची झेप! लक्षवेधी काही तरी करण्याची सुरसुरी उरी बाळगणाच्या तरुणांत नवा आशावाद जागवल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे!

प्रशस्ती/४१