पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संवेदनशील पालक होते. स्वतःच प्रतिकूल परिस्थितीतून वर आले. त्यामुळे प्राचार्य अरविंद सातवेकरांसारखा त्यावेळचा ‘सुताराचा पोर' शिकतो म्हटल्यावर त्यांनी त्याच्यावर पितृत्वाची सतत पाखर धरली. अमरनाथ कांबळेसारखा माणूस हरिजन वाड्यातील चार पोरं पोटाशी धरून शिकवतो हे कळल्यावर श्री मौनी विद्यापीठात हरिजन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करून त्यास अमरनाथ कांबळेचं नाव दिलं! यांत डॉ. जे. पी. नाईकांची दीर्घपल्ल्याची समाजदृष्टी दिसून येते. या अमरनाथ कांबळे वसतिगृहाने, शिकत असताना दोन वेळची भाकरी मला पुरवली होती! हे माझ्या चांगले लक्षात आहे. डॉ. जे. पी. नाईकांचं सातवेकरांनी लिहिलेलं भावपूर्ण शब्दचित्र वाचत असताना जाणवलं की, त्यांनी हे हातचं राखून लिहिले आहे. डॉ. जे. पी. नाईकांचा त्यांना लाभलेला दीर्घ सहवास निकट सान्निध्य पाहता त्यांनी डॉ. जे. पी. नाईक यांचे सविस्तर चरित्र लिहावं! श्री मौनी विद्यापीठ, कोरगांवकर ट्रस्ट या कामी नक्की साहाय्य करतील.

 डॉ. जे. पी. नाईकाप्रमाणे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रांत फार मोठे कार्य केले आहे. सामान्यांच्या घरांपर्यंत शिक्षणाचा ओघ कसा येईल त्यासाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणास लावली आहे. डॉ. जे. पी. नाईक व डॉ. डी. वाय. पाटील यांचे शिक्षणातले काम मोठे असले तरी दोघांच्या कार्याचे संदर्भ मूलतः भिन्न आहेत. लेखकांनी डॉ. डी. वाय. पाटील यांचे व्यक्तिचित्र व्यक्तिगत उतराईच्या भावनेने चित्रित केलं आहे, त्यामुळे त्याचे मोल वेगळेच आहे.

 कोरगावकर विश्वस्त संस्थेतर्फे लेखक संस्था सचिव म्हणून काम करीत असलेने ते कोरगावकर कुटुंबीयांच्या अगदीच सान्निध्यात होते. कै. प्रभाकरपंत यांचे जीवन व कार्य त्यांनी अगदी जवळून समजले. जे जे आपणास ठावे ते ते दुसन्यास सांगावे या ध्यासाने लिहिलेले 'वास्तव' मधील प्रभाकरपंतांचे व्यक्तिचित्र, व्यक्तिचरित्राजवळ जाणारे अधिक. व्यक्तिचित्र लिहायचं तर माणसाचा जिवंत सहवास अनिवार्य असतो. तो लेखकास लाभला नाही. पण प्रभाकरपंताबद्दलच्या अपार आदरामुळे त्यांनी या समाजपुरुषास 'वास्तव'मध्ये अत्यंत सुरेख उभे केले आहे! आज समाजात कृपणता रोज भूमितीच्या पटीने वाढत असताना हा दातृत्वाचा वसा वरदान वाटतो!

 दलितांबद्दल असाधारण आस्था असलेल्या अमरनाथ कांबळे व दलितमित्र बापूसाहेब पाटील यांची या संग्रहातील व्यक्तिचित्रे संग्रहाचे सामाजिक योगदान रेखांकित करतात. अमरनाथ कांबळे व बापूसाहेब

प्रशस्ती/४०