पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/218

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पोराचं ‘बिघडणं'. 'मे सारा सिकवारो' (मी शाळेत शिकणार!) असं पालाआडून दबकत अशोक म्हणतो काय नि लुळ्या बापाचं पित्त खवळतं नि तो बायकोवर खेकसतो, ‘रांडं तुझ्यापायी पोर बिगडलंया, भंगार वेचाय, भीक मागाय तुझा बा जाणार काय? दयमाली.' या कलगी तुच्यानं घरचा संवाद संपतो नि अशोक चोरून शाळेला जातो. त्याची निष्ठा पाहून गुरुजीच पालावर येऊन बापाला समजावतात नि मग अशोकची शाळा शिकणं रूळावर येतं, ते पण भंगार, भीक गोळा करतच.

 अशा अशोकचं शिकणं. त्याचं बी. ए., बी. एड्. होणं, शिक्षक होणं, शिक्षक होऊन जळी, स्थळी विद्रोह करणं खरं नाही वाटत. गोसावी समाज परंपरेनं घेरलेला. जात पंचायत या समाजाचं सर्वोच्च न्यायालय. तेथील पंच म्हणजे पंच परमेश्वर. त्यांच्या जिभेवर येणारा शब्द कायदा. जो पैसे देईल त्याच्या बाजूनं न्याय. या पंचायतीत स्त्रीची किंमत शून्य, पंचायत कुणाच्याही लग्नाची कधीही सुपारी फोडू शकते. स्त्रीवर कोणीही संशय व्यक्त करू शकतो. निवाड्यात स्त्रीस कधीच विचारलं जात नाही. तक्रार आली की ती खरीच समजली जाते. स्त्री म्हणजे पापी हे गृहीतच. नवरा मनाला येईल तेव्हा स्त्रीला सोडचिठ्ठी देणार. जात पंचायत आपल्या मर्जीनं तिचा ‘धारूच्यो करणार. म्हणजे दंड भरून घेऊन दुस-या पुरुषाच्या स्वाधीन करणार. इतकेच नव्हे तर जात पंचायतीच्या मनात आलं की ती ईर्षेवर कोणत्याही स्त्रीस ‘उभायत' ठरवू शकते. स्त्री ‘उभायत' ठरली की तिला आयुष्यभर कोणीही नांदवून घेत नाही. ती विवाहित राहते. मंगळसूत्र असतं. पण तिला नव-याच्या घरी नांदता येत नाही. ती आकर्षक दिसू नये, तिच्याकडे कुणाची नजर जाऊ नये म्हणून तिनं दातवण लावून दात कंपल्सरी काळे करून घ्यायचे, या नि अशा अनेक डागण्या देणारा हा समाज. त्या समाजाच्या जात पंचायती विरोधात अशोक जाधव दंड थोपटतात ते । स्वतःच्या लग्नापासूनच. आपल्या मर्जीनं नि आपल्या शर्तीवर लग्न करून दाखवून जात पंचायतीची मिरासदारी मोडीत काढतात. गोसावी समाजात शिक्षणास विरोध. त्यात मुलींचं शिक्षण म्हणजे मृगजळच. पण अशोक जाधव आपल्या बहिणीला एम. बी. बी. एस. करतात. स्वतः अशोक जाधव गोसावी समाजाचे आपल्या भागातील पहिले पदवीधर. आपल्या बहिणीलाही ते पहिली डॉक्टरीण बनवतात.

 अशोक जाधवांचा पुरुषार्थ इथं संपत नाही. खरं तर इथं तो सुरू होतो म्हणायला हवं. ते आपल्या गोसावी समाज बांधवांचे संघटन करतात. नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करून आपल्या समाजाचं अस्तित्व,

प्रशस्ती/२१७