पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/219

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महत्त्व राजकीय पटलावर नोंदवतात. समाजाची पतसंस्था काढतात. भंगाराची खंदाडी जाते नि टेंपो येतो. समाज बांधवांना म्हाडाची घरं मिळू लागतात. ‘भंगार' वाचताना गोसावी समाजाचा कायाकल्प करणारा एक चित्रपट वाचकांच्या मनापुढे झरझर सरकत राहतो. त्या अर्थाने भंगार आत्मचरित्रास समांतर विकसित होतो. समाजचित्र जिवंत करतं.

 चित्रपटाचा कॅमेरा दृश्याचा फोकस नि फ्रेम ठरवत असतो. ती दृष्टी असते दिग्दर्शकाची नि त्या छाया चित्रकाराची, कॅमेरामनची. ‘भंगार आत्मचरित्राचा फोकस अशोक जाधव यांचं व्यक्तिगत जीवन, चरित्र, चारित्र्य नाही. फ्रेम आहे. गोसावी समाजाचं जिणं नि जगणं. पण अशोक जाधवांनी आपल्या या आत्मचरित्रात फ्रेमलाच फोकस केल्याने त्यांचं जीवन गौण होऊन जातं. ही त्यांची स्वेच्छा पसंती नसते. एखाद्या कार्यकत्र्याला समाज बदलाचा एकदा का घोर लागला की मग तो स्वतः विसर्जित होतो. ‘स्व'ऐवजी 'पर'चा वेध, समष्टीचा गोफ विणण्याचे कार्यकत्र्यांचं वेड त्याचं जीवन व चरित्र सामूहिक, सामुदायिक आणि सामाजिक करून टाकतं. त्या अर्थाने ‘भंगार' हा दलित, वंचित साहित्य प्रवाहातील लेखनाचा व्यवच्छेदक प्रयोग होय. ही कलाकुसर अशोक जाधव यांनी केली नसून ती झाली आहे. त्यामुळे या आत्मकथनात सर्वत्र एकप्रकारची प्रांजळता पसरलेली वाचकांना अनुभवायला मिळते. सुखवस्तू समाजाला स्वतःच्या आत्मरत जीवनातून जागं करण्याची विलक्षण ताकद ‘भंगार' मधील भीषण वास्तवात भरलेली आहे. ती भीषणता तुम्हास केवळ अस्वस्थ करत नाही तर ती अंतर्मुख करून या समाजाप्रती काही करण्याची कार्य प्रेरणा देते. ती प्रेरणा हेच या आत्मकथनाचं यश होय. । |

 मराठी साहित्यात यापूर्वी 'बलुतं', 'उपरा', ‘उचल्या', 'कोल्हाट्याचं पोर’, ‘अक्करमाशी' अशी अनेक आत्मचरित्रं आली. त्यांनी आपल्या परीने डोंबारी, कैकाडी, कोल्हाटी समाजाच्या व्यथा वेशीवर टांगल्या आहेत. ‘भंगार' आत्मचरित्र गोसावी समाजाचं चित्र आपल्यापुढे ठेवते. गोसावी समाजाचं भटकं जीवन, तीन दगडाची चूल, थामल्यावर (तिकाठी) उभी पानं, भंगार गोळा करण्यातील मरण यातना, कोंडाळ्याचे तीन भागीदार (माणूस, कुत्रं नि डुक्कर), जात पंचायतीचा बडेजाव, स्त्रीचं अस्तित्वहीन जगणं, मुलांचं जन्मतः नि जन्मभर वंचित जगणं हे सारं शब्दबद्ध करणारं ‘भंगार' आपणाला गोसावी समाजाचं भंगारपण समजावत वाचकांना अपराधी करतं.

 गोसावी समाजाची स्वतःची अशी भाषा, बोली आहे. ती कुठल्याच

प्रशस्ती/२१८