पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे तर' कविता या संदर्भात लक्षात येते. स्त्रीने कविता लिहिली नि तीत माहेर डोकावलं नाही असं कसं शक्य आहे? 'माझी आई' मधील कवितेत माहेर भावांचा एक अव्यक्त पिंगा सतत जाणवतो.
 सौ. प्रतिभा साठम आपल्या या कवितात जीवनाच्या सर्वांगांच चित्रण करतात. त्यांची कविता एका अर्थानं जीवन लक्ष्यी रचना आहे. 'आठवण', 'हास्य-क्लब' सारख्या कविता या पट्टीतल्या 'सोबत' पण याच वळणाची कविता. जीवनाच्या वृद्धावस्थेत वाट्याला येणाऱ्या अपेक्षेचं वर्णन करणारी त्यांची 'म्हातारी' तर घरी दारी सर्वत्र अनुभवायला मिळते. जीवनाचं मृगजळ सौ. साठम यांनी अनुभवलंय म्हणून समर्थपणे त्या ते प्रतिबिंबित करतात. अंधश्रद्धा, श्राद्ध, पत्रिका, पंचांग सारख्या गोष्टींचा कवयित्रीच्या मनावरचा पगडा तिची पारंपरिकता स्पष्ट करतो. वर्तमानाचं भान त्यांच्या कवितेस पुरत आहे हे 'कचेरी' या कवितेतून स्पष्ट होतं.
 सौ. प्रतिभा साठ यांचा 'माझी आई' कविता संग्रह म्हणजे त्यांचं जीवन संचित. त्यांनी भोगलं, अनुभवलं, पाहिलं, त्याची कविता झाली. त्यामुळे त्यांची कविता जीवनाचं छायाचित्र होऊन गेली. ते कृष्ण-धवल की बहुरंगी हे सांगणं कठीण. त्या कवितेत जीवनाचा कृष्ण पक्ष प्रबळ आहे नि तो स्वाभाविकही म्हणावा लागेल. त्या सतत लिहीत राहतील तर त्यांची अनुभव समृद्ध कविता कला समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही. त्यांना, त्यांच्या धडपडीस हार्दिक शुभेच्छा. स्त्री संसाराच्या 'रांधा वाढा, उष्टी काढा' मधून मोकळा श्वास घेऊन शकते, मनातले दबले, कोंडलेले निःश्वास मोकळे करते, मनातलं प्रकट करते हे जीवन बदलाचं, स्त्री मुक्तीचंच लक्षण आहे. त्यांच्यासारखे पती इतरांना लाभतील, प्रोत्साहन देतील तर सर्व भगिनींचे भावकाव्य होईल. ते व्हावे ही अपेक्षा.

                                                                 ■■

दि. ३० ऑक्टोबर, २००१


प्रशस्ती/२०