पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/22

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सिनेमाचा रंग वेगळा (व्यक्तिचित्र संग्रह)

माधवराव देशपांडे

कीर्ती प्रकाशन, कोल्हापूर

प्रकाशन - नोव्हेंबर, २00३

पृष्ठे - २00 किंमत - १५0/-



चित्रपट सृष्टीतील झाकली माणके

 ‘सिनेमाचा रंग वेगळा' हे चित्रपट सृष्टीतील संकलक म्हणून अनेक वर्षे कार्य केलेल्या श्री. माधवराव देशपांडे यांचे चंदेरी दुनियेतील कलंदरांच्या व्यक्तिचित्रांचे संकलन होय. ते त्यांनी आठवणींच्या अंगाने लिहिले आहे. त्यामुळे या पुस्तकास एक वेगळी रंगत आली आहे. मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीची खरी राजधानी मुंबईच. या सृष्टीतील अनेक मातब्बरांचा राबता मुंबापुरीत असल्याने नशीब काढायला मुंबईत गेलेल्या माधव सरांना सृष्टीतील सामान्य व असामान्य दोहोंचा सहवास लाभला. या सहवासाच्या स्मृतिगंधाने माधवरावांना लिहिते केले.

 श्री. माधवराव देशपांडे तसे अल्पशिक्षित. पुस्तकातील ‘स्वप्न माझे मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे मुंबईत नशीब काढायला गेलेला हा तत्कालीन तरूण. हॉटेलच्या चहाची ऑर्डर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कचेरीत नेहमी घेऊन जाणारा चहावाला पोच्या. रोजच्या जाण्यायेण्यातून संवाद, भाषणे, शिबिरे यांतून त्याला अन्याय, अत्याचारांची जाणीव होते. आपल्या अशिक्षिततेचे त्याला भान येते. तो स्वप्रयत्नाने लिहायला, वाचायला शिकतो. आकडे लिहू लागल्यानंतर त्याला जुगाराचे आकडे घेणारा बेटिंग घ्यायची नोकरी देतो. पोलीस ठाण्याच्या प्रसादाने आपण करतो ती नोकरी गैर, अवैध असल्याचे लक्षात येताच तो आपला रहिवास, परिसर बदलतो.

प्रशस्ती/२१