पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 यात छान-छान कविता आहेत. त्या कवितात वाघोबा, ससोबा, बोकोबा, चांदोबा सगळे बाबा आहेत. शिवाय खारुताई, चिऊताई पण ! एवढेच काय ? पेपरवाला पण आहे. लपंडावाबरोबर क्रिकेटही आहे. मनीचा एकादशी दिवशीचा उंदराचा फराळ फर्मासच! पाहुण्यांच्या स्वागतातली छोटीशी फटफजिती ही सुंदर. खूप खूप आवडतील तुम्हाला या कविता. अशी आहे की कवितेची अंगत-पंगत सुंदर संगत!
 वाचा, हसा, खूष व्हा ! स्वतः वाचा. इतर मित्र-मैत्रिणींना वाचून दाखवा. वाढदिवसाला त्यांना हे पुस्तक भेट द्या. तुम्ही स्वतः पण कविता लिहा. तुम्हीही कवी होऊ शकता. मराठीत एका मोठ्या कवीचं नावच 'बालकवी' आहे. तुम्ही सर्व बालकवी व्हा ! असंच हा 'गुड्डू' तुम्हाला सांगेल. वाचाल तर वाचाल ! वाचा नि वाचा. भरपूर वाचा.
तुमचा,

सुनीलकाका
                                                                 ■■

दि. २६.१०.२००१







प्रशस्ती/१८