पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/188

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वावलंबी नि स्वाभिमानी बनवून सन्मानित करायचे. या धाग्याने या कथासंग्रहातील कथाकारांनी सामाजिक बांधिलकीच्या भावना नि नात्याने हे लेखन केले आहे. या कथांचा वाचक लक्ष्य गट ग्रामीण समाज आहे. शहरात स्त्री-पुरुष समानता रुजली. खेड्यात बाकी आहे. लोकांना लोकांच्या । भाषेत लिहिले, बोलले की उमजते, समजते हे लक्षात घेऊन या कथांची भाषा, पात्रे, प्रसंग, संवाद, पर्यावरण ग्रामीण ठेवल्याने त्या प्रभावी झाल्या आहेत.
 ‘मुली दुर्मीळ झाल्या हो' संग्रहाची सुरुवात बाबूराव शिरसाट यांनी लिहिली आहे. या कथेत मुलगी दुर्मीळ झाल्याने मांडवातून वधूला पळवून नेण्याचा घाट घातला आहे. या प्रसंगाने कथाकाराने मुलींचे दुर्मीळपण अधोरेखित केले आहे. संग्रहातील त्यांची दुसरी कथा आहे ‘डॉक्टरांशी संवाद'. कथेत पैशासाठी स्त्री भ्रूण हत्या करणा-या डॉक्टरांबद्दल नाराजी आहे. ती स्वाभाविकच म्हणायला हवी. सन १९८८ च्या भ्रूण हत्या बंदी आणि नंतरच्या गर्भपात, गर्भनिदान बंदीमुळे (१९९४) महाराष्ट्र राज्य पुरोगामी झाले. या कथेस कायदा साक्षरता व प्रचार, प्रसाराची पार्श्वभूमी आहे. जगात चांगल्या गोष्टीचा पण प्रचार करावा लागतो, यासारखे दुर्दैव ते कोणते?

 या संग्रहात दोन-दोन कथा लिहिणारे आणखी काही कथाकार आहेत. पैकी एक आहेत ज्येष्ठ बाल साहित्यिक रजनी हिरळीकर. त्यांच्या लेखनाला समाज शिक्षकाच्या संस्कारशील शैलीचा स्पर्श आहे. त्या सांगत नाहीत, समजावतात. समुपदेशक ज्याप्रमाणे प्रश्नाची उकल हळुवारपणे करत गुंता सोडतो, तशा त्या लिहितात. यात विमलचा प्रसंग आहे. मुलगी झाली तर नवरा आपणाला सोडेल या भीतीत जीव मुठीत घेऊन जगणारी. अशा शेकडो विमला घरोघरी गुदमरत जगताहेत. कथेत लाडू, पेढे, जिलेबीच्या रूपाने समाज मनात पसरलेला लिंगभाव लेखिकेने सूचकपणे वर्णिला आहे. ‘निर्मलाचा लढा' कथेतील निर्मला तिची चाळिशी उलटली तरी तिला मूल-बाळ होत नाही. ती उकिरड्यात टाकलेल्या बाळाला, मुलीला ‘भाग्यश्री बनवते. या सर्वच कथांमधून एक सकारात्मकता, आदर्शवाद, विधायकता । जोपासली गेली आहे. व्यक्तिगत दुःखाचं उन्नयन करत सामाजिक दायित्व आपण निभावत गेलो की सामाजिक प्रश्न सुटायला मदत होत राहते. या कथांचे मोठे समाजमूल्य, जीवनमूल्य आहे. 'नकोशी' मुलगी हवीशी' करणे यासारखी समाज ऋणाची उतराई दुसरी कोणती असणार? वात्सल्य सदनात मुली वाढण्यापेक्षा प्रत्येक घर वात्सल्यसदन होईल, प्रत्येक स्त्री

प्रशस्ती/१८७