पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/187

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

द्यावा लागण्याच्या प्रथेचा बळी मुली ठरल्या. विज्ञान प्राप्त गर्भनिदान सुविधा खरं तर अपंग बाळ जन्मू नये म्हणून तिचा वापर व्हायचा. हुशार माणसाने या शोध-सुविधेचा गैरवापर लिंग निदानार्थ करण्यास प्रारंभ केला. स्त्री-भ्रूण हत्या हे हुंडाबळीचे अपत्य होय. वाढत्या स्त्री भ्रूण हत्येने स्त्रीपुरुष प्रमाण विषम होत गेले. ही असमानता माणसाच्या अस्तित्वाच्या मुळावर आघात करती झाली व समाज जागा झाला. गर्भनिदान बंदी, गर्भपात बंदी कायदे झाले. पण लोक जागृती होत नव्हती. म्हणून साहित्य, प्रबोधन, प्रचार, प्रसार अशी चतुःसूत्री धरून शासनाने कार्य आरंभिले. सार्क बालिका वर्षाच्या निमित्ताने स्त्रीविषयक प्रश्नांच्या जागृतीस महत्त्व आले. मुलगी दुर्मीळ होण्याचे दुष्परिणाम समाजास जाणवू लागले. त्याविषयी प्रबोधनास गती आली. प्रबोधन साहित्याची गरज भासू लागली. त्याचे अपत्य म्हणजे 'मुलगी दुर्मीळ झाली हो' हा कथासंग्रह।

  हा कथासंग्रह माझे स्नेही व विख्यात बाल साहित्यिक बाबूराव शिरसाट यांनी संपादित केला आहे. या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती सहा महिन्यात प्रकाशित होते आहे, ही आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यांनी यापूर्वी याच विषयावर ‘एक कळी उमलताना...' पुस्तक लिहून आपले स्त्री दाक्षिण्य सिद्ध केले होते. तसे शिरसाट कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्य करत होते. पण ते संवेदनशील साहित्यिक असल्याने समाजाप्रती त्यांच्या मनात एक प्रकारची कणव नि कळकळ सतत भरलेली मी अनुभवली आहे. बाबूराव शिरसाट यांनी संपादित केलेला ‘मुली दुर्मीळ झाल्या हो' हा कथासंग्रह दहा कथाकारांच्या रचनांनी आकारला आहे. इंग्रजीत ज्याला 'Theme Based Story' वा मराठीत बोधकथा म्हटल्या जातात, तशा या कथा. म्हटल्यातून हेतुपूर्वक लिहिलेल्या. अशा कथांचे स्वतःचे असे वैशिष्ट्य असते. त्या सहेतुक लिहिलेल्या असतात. त्यांचे लक्ष्य निश्चित असते. ज्याला एखाद्या गोष्टीचा प्रचार, प्रसार, प्रबोधन करायचे असते, असा लेखकच सहेतुक लिहितो. गेल्या शतकाच्या मध्यास विशेषतः दुस-या महायुद्धाच्या आगेमागे असे प्रचारकी साहित्य मोठ्या प्रमाणात उदयाला आले होते. ते बहुतांशी राजकीय होते.

 ‘मुली दुर्मीळ झाल्या हो' कथासंग्रहातील कथांचे ब्रीद आहे. स्त्रीभ्रूण हत्या'! त्या रोखायच्या, जनसंख्येत मुलींचे प्रमाण वाढेल असे पाहायचे. लिंगभेद संपवून स्त्री-पुरुष समान असा भाव समाजात रुजवायचा. स्त्रीस माणूस म्हणून जन्माला घालायचे, जगवायचे, वाढवायचे, शिकवायचे,

प्रशस्ती/१८६