समाज सुधारणेचा समकालीन अभ्यास होय. त्यामुळे लेखसंग्रहापलीकडे त्याचे मोल आहे.
प्रा. कुसुम कुलकर्णी या माझ्या शिक्षिका होत. शिक्षकाच्या ग्रंथास शिष्याने प्रास्ताविक लिहिण्याचे केलेले हे औद्धत्य नव्हे तर गुरू आज्ञेचे ते विनम्र पालन होय. या गुरू आज्ञेत ‘शिष्यात् इच्छेत पराजय'ची उदारता आहे. महाराष्ट्र समाज सतत पुरोगामी राहिला याचे रहस्य व्यक्ती-व्यक्तींच्या अशा सततच्या नव आचरण शृंखलेत सामावलेले आपणास दिसून येईल. युरोपात सुरू झालेली प्रबोधन पर्वाची पहाट महाराष्ट्रात उदयास यायला आणखी तीनशे वर्षे लागली. पण इथे जेव्हा या प्रबोधनाचा विचार रुजला तेव्हा त्या विचारांनी येथील समाजमनात असे मूळ धरले की येत्या हजारो वर्षांत त्याचे उच्चाटन करणे केवळ अशक्य. एखादा विचार उशिरा की लवकर रुजतो हे महत्त्वाचे नाही; महत्त्व असते त्याच्या दृढीकरणाचे. ‘प्रबोधन पर्व' या दृढीकरणाच्या प्रयत्नातील एक प्रभावी साधनग्रंथ म्हणून इतिहास त्याची नोंद घेईल अशी मला आशा आहे.
▄ ▄
दि. १८ एप्रिल, १९९९.
‘अक्षय्य तृतीया'