पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुधारणांसंबंधी विचार सुरू झाला. हिंदूंचा आचारधर्म, वाईट चालीरीती, अंधश्रद्धा, बालविवाह, पुनर्विवाह, हुंडापद्धती, बहुभार्या प्रथा, स्त्रीशिक्षण संबंधी विचारातून तत्कालीन सुशिक्षित तरुणांत वर्तन-परिवर्तन घडून आले. त्यातून चातुर्वर्ण्य, जातिभेद, कालबाह्य रूढी विरोधी वातावरण तयार झाले. राजा राममोहन रॉय, म. फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडिता रमाबाई, महर्षी शिंदे, गाडगेमहाराज, म. गांधी प्रभृतींनी जोपासलेल्या समाज व विचार प्रबोधनाचा वारसा चालवणाच्या इतिहासाचार्य राजवाडे, साहित्यकार वि. द. घाटे, दुर्गा भागवत, मुन्शी प्रेमचंदांपर्यंतच्या प्रबोधन पर्वाचा आलेख प्रा. कुसुम कुलकर्णी यांनी आपल्या या लेखसंग्रहातून शब्दबद्ध केला आहे.

 ‘प्रबोधन पर्व' हा लेखिकेच्या पूर्व प्रकाशित विविध लेखांचा संग्रह. या ग्रंथ वाचनातून भेदातीत जीवन विकसित करण्याचा लेखिकेचा मनोदय तिच्या मनोगतात स्पष्ट झाला आहे. महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या दिंडीत सामील झालेल्या कार्यकत्र्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून झालेले हे लेखन होय. लेखिकेने ग्रंथरूपात ते संपादित करताना लेख प्रकाशनाच्या कालानुक्रमाने आपणापुढे ठेवले आहेत. ते इतिहास सापेक्ष ठेवले असते तर या ग्रंथाचे मोल अधिक वाढले असते. विचार विकासाच्या सुसंगतीच्या दृष्टीने ते आवश्यकच नाही तर अनिवार्यही होते. असे असले, तरी महाराष्ट्रातील समाज प्रबोधन पर्वाचा सम्यक विचार करणा-यांना हा ग्रंथ संदर्भाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा असा झाला आहे यात शंका नाही.

 महाराष्ट्रातील समाजसुधारणांना संत साहित्याची व्यापक पार्श्वभूमी नि बैठक आहे. येथील वारकरी संप्रदायाने आपल्या भक्ती-आंदोलनाने संतांची विचार परंपरा आचरणाने वृद्धिंगत केली. यातून इथे उदयास आलेल्या वैचारिक उदारतेमुळे हमीद दलवाईसारखे समाजसुधारक, सत्यशोधक परंपरेविरुद्ध बंड करू शकले. या सर्वांमागील सामाजिक आशयाची उकल करणारा हा ग्रंथ प्राचीन ते अर्वाचीन प्रबोधनाचा साक्षेपी । इतिहास होय. समाज, धर्म, साहित्य, संस्कृती, इतिहास, स्त्री शिक्षण । इत्यादी अंगांनी लेखिकेने तो आपणापुढे उभा केला आहे. व्यक्ती व तिच्या कार्यातून केवळ जीवन चरित्रच रेखाटले जात नाही, तर बदलाच्या कालसापेक्ष नोंदीही त्यातून आपसूक येत असतात हे या ग्रंथाच्या वाचनात लक्षात येते. या ग्रंथाचे महत्त्व अशा अर्थाने आगळे आहे की हा प्रयत्न इतिहास लेखनाची केवळ द्विरुक्ती नाही. लेखिकेने समकालीन संदर्भात केलेली ती प्रबोधनाची चिकित्सादेखील आहे. त्या दृष्टीने 'प्रबोधन पर्व' महाराष्ट्राच्या

प्रशस्ती/१५