पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/163

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘इंग्रजीची ऐशीतैशी- नव्या पिढीतील 'इंग्रजीमॅनियाचं चित्रण करणारा विनोदी लेख. नव्या ज्ञानसमाजाची अशी धारणा होऊन बसली आहे की इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही. इंग्रजी आल्याशिवाय आपणास वर्तमानाचे महाद्वार उघडणार नाही. अशा भ्रमजालात अडकलेल्या ममीज ‘इंग्लिश स्पीकिंग कोर्स'ची वाट धरून अमेरिकन, युरोपियन बनू इच्छित आहेत. यामुळे नवा पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात घालतो, ते आपलं अपुरं स्वप्न पूर्ण करण्याची आकांक्षा म्हणून. पण त्यात सर्वच भाषा मुळापासून उपटून आपण टाकत आहोत. मातृभाषा, राष्ट्रभाषा व आंतरराष्ट्रीय भाषा जनामनात रुजायच्या बंध होऊन, नवे भाषिक संकर घडत आहे. व्याकरण संपून व्यवहारशास्त्र हाच भाषेचा आधार ठरतो आहे. भाषासंकराचं हे संकट नवं सांस्कृतिक अरिष्ट जन्मास घालत असल्याची जाणीव देणारा हा लेख विनोदी वाटला, तरी तो आपल्या विसंगत व्यवहारावर नेमकेपणे बोट ठेवतो.

 ‘कौतुकायण' वाचताना शाळांमधून शिक्षण संपून शोषणाचा नवा अध्याय सुरू झाल्याचा घंटानाद ऐकवणारा हा लेख गॅदरिंगच्या निमित्तानं एका बीभत्स लोकव्यवहाराचा तमाशा उभा करतो. गॅदरिंग सुरू झालं ते सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी. आज त्याचं व्यापारीकरण, विद्रूपीकरण झालं आहे. रेकॉर्ड डान्स, रेडिमेड ड्रेपरी, कोरिओग्राफरचं फॅड या साच्यांत मुलं कठपुतळे होत आहेत. शिक्षकांची निष्क्रियता, कामचोरी, कलासक्तपणाचा अभाव हे सारं वैगुण्य. त्यात कुणाचंच कौतुक राहिलेलं नाही. शिक्षण हा पैशाचा, प्रदर्शनाचा ओंगळ खेळ झाल्याचं प्रतिभा जगदाळे या लेखातून ज्या उपहासाने स्पष्ट करतात, ते ओरखडे ओढणारं आहे।।

 ‘जीवघेणे हार्दिक स्वागत' डासांच्या उच्छादातून आपलं आरोग्य औदासिन्य व प्रतिबंधात्मक आरोग्याची दिवाळखोरी रेखांकित करणारा लेख आहे. ‘मच्छर पुराण!' तो लेखिकेचं सूक्ष्म निरीक्षण नोंदवतो. मच्छरांपासून वाचवायला माणसानं काय काय उपाय शोधले, धूप, मच्छरदाणी, कासवछाप अगरबत्ती, कॉईल, वड्या, लिक्विड, मलम, रॅकेट, तरी मच्छर अजिंक्यच! या वास्तवाचं भान देणारा हा विनोदी लेख.
  या सर्वांचे समग्र रूप म्हणजे 'मिश्किली. त्याला ‘शाही विनोद पुराण' ही म्हणता येईल. कारण याची लेखन शैली टीकेपेक्षा हास्याकडे, हलक्याफुलक्या रंजक पद्धतीकडे झुकणारी आहे. या लेखनाचा हेतूही रंजनच आहे. पण माझ्यासारख्या वाचकास मूळ लेखिकेस अभिप्रेत नसलेलंही

प्रशस्ती/१६२